मुंबई : भारताचं आजचं स्वरुप हे मराठ्यांचे कार्य आणि शौर्यामुळेच आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईतील एलफिन्स्टनमध्ये कामगार मैदानात आय़ोजित मराठा सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.


मराठा मोर्चांसमोर सराकर नतमस्तक : मुख्यमंत्री

गेले काही वर्षे मराठा तरुण अस्वस्थ आहे. त्यामुळे अभूतपूर्व मोर्चे निघाले. समाजाचे विराट रुप त्यातून दिसले, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी मोर्चांची तुलना महाभारतातील एका प्रसंगाशी केली. “महाभारतात श्रीकृष्णाने विराट रुपाचं दर्शन दिल्यावर जशी सृष्टी नतमस्तक झाली, त्याप्रमाणे मराठा मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या विराट रुपाचे दर्शन झाले. सरकार या रुपापुढे नतमस्तक झाले आणि त्यामुळे विविध निर्णय घेतले.”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

“आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे. त्यावर कार्यवाही सुरु आहे. न्यायालयात यावर सरकार सक्षमपणे काम करते आहे.”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच, “मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आणि उच्च शिक्षणाची दारे उघडली गेली. लाखो तरुण या योजनेचा फायदा घेत आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळ केवळ कागदावर होते, ते आम्ही जिवंत केले. त्यातून तरुण लाभ घेत आहेत.”, असे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.

“मराठा बिझनेसमन फोरमने नोडल एजन्सी म्हणून काम करावे आणि महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एक हजार तरुण उद्योजक बनतील, असे नियोजन करावे. समाजातल्या सर्व संस्था आणि संघटनांनी सरकारसोबत हात मिळवणी करावी आणि समाजाचा विकास करावा. सर्वांना नोडल एजन्सी म्हणून नेमायला सरकार तयार आहे.”, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.