दुष्काळग्रस्तांसाठी 'नाम'तर्फे मुंबई-पुण्यात व्यवस्था
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2016 11:27 AM (IST)
मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळामुळे स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच्या 'नाम' फाऊंडेशनतर्फे मदतीचा हात दिला जाणार आहे. स्थलांतरितांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मुंबई-पुण्यात करण्यात येणार आहे. मुंबई आणि पुण्यात स्थलांतरितांना सुविधा उपल्ब्ध करुन देण्याचं आवाहनही 'नाम' फाऊंडेशनने केलं आहे. अनेक स्वयंसेवी संघटना 'नाम' फाऊंडेशनच्या संपर्कात असल्याचं नाना पाटेकरांनी सांगितलं. मुंबई-पुण्यात महापालिकेच्या मोकळ्या जागा, मैदानं यांच्यावर स्थलांतरितांसाठी तात्पुरती घरं, छावण्या उभाराव्यात यासाठी 'नाम' प्रयत्नशील आहे. 'नाम' फाऊंडेशन मुंबई-पुण्यातील महापालिका प्रशासनांशी संपर्क साधण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला स्थलांतरितांच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करताना राजकीय पक्षांनी आपली वितुष्टे आणि श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवावी, अशी विनंतीही नाना पाटेकरांनी हात जोडून केली आहे.