MVA Seat Sharing Lok Sabha 2024: महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी आपल्या मुला-मुलींना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी वंचितने (Vanchit) केली आहे. विशेष म्हणजे वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपाबाबत वाटाघाटी सुरू असताना वंचितने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित मध्ये नवा तिढा निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेषतः विदर्भातील (Vidarbha) जागेवरून वंचित आक्रमक होताना दिसत आहे. काँग्रेस (Congress) अथवा इतर घटक पक्षांनी प्रस्थापित घराण्यांना वगळून इतर वंचित समूहाला कुठेतरी संधी दिली पाहिजे, अशी मागणी वंचितच्या वतीने करण्यात आली आहे.
घराणेशाहीवर वंचितने ठेवलं बोट!
विदर्भातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील जी प्रस्थापित घराणी आहे, ज्यामध्ये मग ती मुत्तेमवारांचे घराणं असेल, वडट्टीवारांचे घराणं असेल, आत्रामांचे घराणं असेल किंवा मग ते देशमुख यांचे किंवा मग धानोरकरांचं घराणं असेल. गेली कित्येक वर्षांपासून वारंवार याच घराण्यातील नावे समोर आलेली आहेत.
त्यामुळे आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आत्तापर्यंत ज्या घराण्यांना पोसलय याला कुठेतरी वागळून इतर वंचित समूहाला संधी दिली पाहिजे. अशी मागणी विदर्भातील वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता वंचित आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षात घराणेशाहीवरुन पुन्हा कुठला नवा वाद निर्माण होतो का, की यावर काही तोडगा निघतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संजय राऊत खोटं बोलतात
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज थेट महविकास आघाडीला इशारा देत संजय राऊत खोटं बोलत असल्याचा आरोप केलाय. प्रकाश आंबेडकर आज अमरावती येथे आले असता ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही, असं खासदार संजय राऊत म्हणतात. मात्र ते खोटं बोलतात. महाविकास आघाडीमध्ये आपापसात मतभेद असल्यानेच जागावाटप रखडले असल्याचे ते म्हणाले.
त्यामुळे त्यानी पहिले मतभेद मिटवावेत, आपल्याला मोदींना हरवण्यासाठी लढायचं आहे. त्यामुळे काँग्रेसने देखील त्यांचा इगो बाजूला ठेवावा असंही ते म्हणाले आहे. अशातच आता विदर्भातील जागावाटपाबाबत वंचितने आक्रमक पवित्रा घेत घराणेशाहीवर बोट ठेवलं असल्याने महाविकास आघाडीत नवा वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रखडलेल्या जागावाटपाला वंचित जबाबदार नाही
महविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा रखडली असून त्यासाठी वंचित जबाबदार नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ते म्हणाले की, मविआमध्ये 10 जागेवरून मतभेद सुरू आहेत. पाच जागा अशा आहेत त्यावर तिन्ही पक्षात शेअरिंग होत नाही. पाचही जण जागा मागत आहेत. महाविकास आघाडीमधील भांडण जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत जागावाटप होणार नाही, संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात असं सांगत आधी तुमच्यातील भांडण मिटवा असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस प्रभारी रमेश यांना मी पत्र लिहिलं आहे. सगळी हकीकत मी लिहलं आहे. आम्ही समजोता करायला तयार आहे. पण त्यांच्याकडून अजून उत्तर आलेलं नाही. महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा आम्ही करत असल्याचे देखील आंबेडकर म्हणाले.