MVA Seat Sharing In Maharashtra : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कळीचा मुद्दा झालेल्या वंचित बहुजन आघाडीचा (Vanchti Bahujan Aghadi) महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) समावेश होणार की नाही? याची चर्चा लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) कार्यक्रम जाहीर झाला, तरी सुरूच आहे. मात्र, आता लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी विरोधात असलेला बचावात्मक पवित्रा बदलून टाकत थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. 


वंचितला नव्याने प्रस्ताव जाणार नाही 


वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव देण्यात येणार नसून दिलेल्या प्रस्तावावर वंचित बहुजन आघाडीनेच निर्णय घ्यायचा आहे या मतापर्यंत महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट केली आहे. काल (16 मार्च) शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. 


लोकसभेसाठी 17 जागा मागितल्याने वंचितशिवाय बैठकीमध्ये विचार


या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपावर खल करण्यात आला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी 17 जागा मागितल्याने वंचितशिवाय बैठकीमध्ये विचार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या निवडणुकीमध्ये शरद पवार गट दहा ते बारा जागांवर निवडणूक लढवणार असून काँग्रेस 18 ते 20 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा या शिवसेना ठाकरे गट आणि मित्र पक्ष राजू शेट्टी यांच्यासह दिल्या जाणार आहेत. 


दरम्यान आज (17 मार्च) इंडिया आघाडीकडून मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे. शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेसाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी, प्रियंका गांधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. 


इंडिया आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन


महाविकास आघाडीमधील नेते सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत.उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सुद्धा सभेला उपस्थिती असेल. दरम्यान राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा समारोप या सभेच्या माध्यमातून होईल. या सभेनंतर महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा जागा वाटपासंदर्भातील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांची एकत्रित लोकसभा जागा वाटपाची पत्रकार परिषद घेण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वंचितच्या अटी शर्तीने आणि भूमिकेने हैराण झालेल्या महाविकास आघाडी वंचितशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे का? अशी सुद्धा आता चर्चा वर्तवली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या