श्रीगोंद्यात घारगावजवळ रेल्वे मार्ग खचल्यामुळे गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसचं इंजिन रुळाला घासलं. त्यामुळे रेल्वे रुळाला मोठा तडा गेला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवलं आणि मोठा अपघात टळला.
गुरुवारी दुपारी साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रुळाला तडे गेल्याने क्रेनच्या सहाय्यानं इंजिन हटवण्यात आलं, तर रेल्वेच्या डब्यांना पाठीमागून इंजिन जोडून विसापूरला आणण्यात आलं. त्यामुळे दुपारी चार वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांची खाण्या-पिण्याची गैरसोय झाली. स्वच्छतागृहात पाणी टंचाई जाणवल्याचंही प्रवाशांनी सांगितलं.
दरम्यान, कायदा सुव्यवस्था आणि लूटमार रोखण्यासाठी रेल्वेने सशस्त्र पोलिस तैनात केले होते. रात्री दीड वाजता खचलेला रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला आणि तडे गेलेल्या रुळावर दुसरा पर्यायी रुळ टाकल्यानंतर गोवा एक्स्प्रेस रवाना झाली.
घारगावच्या परिसरात रेल्वे मार्गावरील गेट बंद करुन बोगद्याचं काम सुरु आहे. या कामासाठी चार तासाचा ब्लॉक घेण्यात आला होता. काम झाल्यानंतर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, मात्र पटरीच्या खाली मातीचा भराव व्यवस्थित टाकण्यात आला नव्हता. त्यामुळे रेल्वे येताच वजनानं भराव खचला आणि रुळाला तडे गेले.
शेजारीच बोगद्यासाठी तब्बल वीस ते तीस फुटांचा खड्डा खोदण्यात आला आहे. रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे चालकानं त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा अनर्थ टळला.
या दुर्घटनेमुळे मनमाड-दौंड मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरील अनेक पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या.