नाशिक: एकटी राहत असलेल्या महिलेचा दोरीने गळा आवळून खून केल्याचा प्रकार नाशिकमधल्या जेलरोड परिसरात उघडकीस आला आहे. मृतदेह कुजल्याने इमारतीत दुर्गंधी सुटल्यानंतर, शेजाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली.

 

नंदा अनिल कपलीकर असं या महिलेचं नाव आहे. नंदा या एकट्याच राहात होत्या. अंदाजे 3 दिवसापूर्वीच त्यांचा खून करुन मृतदेह बाथरुममध्ये ठेवल्याचं पोलीस पंचनाम्यात समोर आलं आहे. राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळच्या इमारतीत ही घटना उघडकीस आली.

 

पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी नंदा यांचा मृतदेह बाथरुममध्ये आढळून आला.

 

पंचनाम्यानंतर नंदा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. साधारण 3 दिवसापूर्वी नंदा यांचा दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

 

दरम्यान, गेल्या 10 वर्षापासून नंदा या एकट्याचाच या घरात राहत होत्या. मात्र काही दिवसांपासून एक व्यक्ती त्यांच्याकडे सातत्याने ये-जा करत असे, अशी माहिती परिसरातील नागरीकांनी पोलीसांना दिली आहे. त्यामुळं ही व्यक्ती कोण? तिचा या खुनाशी काही संबंध आहे का...? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.