पुण्यात धरणात बुडालेल्या चेन्नईच्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले
एबीपी माझा वेब टीम | 26 Apr 2018 12:29 PM (IST)
पुण्यात मुळशीमध्ये कातरखडक गावाजवळ धरणात तीन विद्यार्थी बुडाले. त्यापैकी एक मृतदेह काल, तर दुसरा मृतदेह आज सापडला.
पुणे: पुण्याजवळच्या धरणात बुडालेल्या चेन्नईच्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. समरकॅम्पसाठी ही मुलं पुण्यात आली होती. यावेळी पुण्यात मुळशीमध्ये कातरखडक गावाजवळ धरणात तीन विद्यार्थी बुडाले. त्यापैकी एक मृतदेह काल, दुसरा आज सकाळी आणि तिसरा मृतदेह आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सापडला. बुडालेले तीनही विद्यार्थी 13 वर्षांचे आहेत. दानिश राजा, संतोष के आणि सर्वन्ना अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. चेन्नईतील विद्यार्थ्यांचा समर कॅम्प चेन्नईहून ईसीएस मॅट्रिक्युलेशन शाळेतून 20 विद्यार्थ्यांचा ग्रुप मुळशीतील जॅकलीन स्कूलमध्ये एक आठवड्याच्या समर कॅम्पसाठी आला होता. त्यांच्यासोबत एक पुरुष, तर तीन महिला शिक्षक होत्या. बुधवारी त्यांच्या कॅम्पचा पहिलाच दिवस होता. कॅम्पची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास विद्यार्थी आणि शिक्षक धरणाजवळ आली. त्यातील तीन मुलं कातरखडक धरणाच्या पाण्यात गेली. मात्र त्यांना पाण्याबाहेर पडता आलं नाही. काल एका विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पौडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. रात्र झाल्यामुळे इतर दोघांचं शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. आज सकाळपासून परत त्यांचा शोध घेण्यात येत आहे. संबंधित बातम्या