पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प असताना राज्य निवडणूक आयोगाने मात्र मुदत संपलेल्या नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतीत प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता मुदत संपणाऱ्या राज्यातील जवळपास 200 नगरपालिका आणि नव्याने मंजुरी दिलेल्या 20 नगरपंचायत आणि नागरपरिषदांना प्रभाग रचना आणि सदस्य संख्या तयार करून घ्यावी लागणार आहे.
याबाबत आयोगाने प्रभाग रचना कशी करायची याबाबत अजून डिटेल्स दिलेले नसले तरी येत्या दोन तीन दिवसात याचाही तपशील मिळू शकणार आहे. राज्यातील डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत ज्यांची मुदत संपत आहे आणि ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायत याना नव्याने मंजुरी दिली आहे अशा सर्व ठिकाणी ही प्रभाग रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही प्रभाग रचना आता ऑनलाईन गुगलवरून आयोगाला सादर करायची असून याचे नकाशे देखील द्यावे लागणार आहेत.
सर्वसाधारणपणे 2011 च्या जनगणनेनुसार ही प्रभाग रचना असून यंदा सिंगल वॉर्ड प्रभाग रचना करायची असल्याने नागरसेवकांवरील ताण कमी होऊन प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक प्रभागातच काम करावे लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर , बार्शी , अक्कलकोट , सांगोला , करमाळा , कुर्डुवाडी , मैंदर्गी , मंगळवेढा या नागरपरिषदांची मुदत फेब्रुवारी 22 अखेर संपत आहे. नव्याने स्थापन झालेल्या अकलूज नगरपरिषद सह महाळुंग श्रीपूर , नातेपुते आणि वैराग या तीन नगरपंचायतींना प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यावेळी केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एवढेच आरक्षण राहण्याची शक्यता असून इतर मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रभागाला जादा प्रभाग उपलब्ध होणार आहेत. हे काम 23 ऑगस्टपासून सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यावर प्रभाग रचना नागरिकांच्या आक्षेपासाठी प्रसिद्ध केली जाईल.