अहमदनगर: गावात विमान येतंय, पण एसटी नाही, असं तुम्हाला कुणी सांगितलं, तर विश्वास बसणार नाही. पण साईंच्या शिर्डीतील ही सत्य परिस्थिती आहे.
मुंबई-शिर्डी ही विमानसेवेची काल मंगळवारी चाचणी झाली. येत्या 1 ऑक्टोबरपासून या सेवेचं लोकापर्ण होणार आहे.
मात्र ज्या गावकऱ्यांनी शिर्डी विमानतळासाठी हजारो एकर जमीन दिली, त्या काकडी गावातील समस्या विमानतळ पूर्ण होऊनही जैसे थेच आहेत. ज्या काकडी गावात विमानतळ बनवण्यात आलं आहे, त्या गावात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे, एसटी सेवा बंद झाली आहे. त्यामुळे गावात विमान येतं, पण एसटी येत नाही, अशी स्थिती आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांनी विमानतळाला जागा देण्यासाठी विरोध केल्याने, जवळपास तीन ठिकाणे बदलण्यात आली होती. अखेर शिर्डी पासून 12 किमी अंतरावर असलेल्या कोपरगाव आणि राहाता तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या काकडी गावातील लोकांनी आपली शेती देण्याची तयारी दर्शवली.
गावाचा विकास होणार, रस्ते होणार, पाणी येणार, शाळा बांधली जाणार या अपेक्षेने ग्रामस्थांनी विमानतळ करण्यास जमिनी दिल्या. काकडी गावातील विमानतळासाठी ज्यांची जमीन गेली, त्यांच्या घरातील एकाला विमानतळावर नोकरीत सामावून घेणार अशी एक ना अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र आज शिर्डीच्या या विमानतळावर विमान उतरले तरीही गावचा विकास तर दूर, गावात एसटीही येत नाही, अशी खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
ज्या काकडी गावात विमानाची यशस्वी चाचणी करण्यात आली, त्या गावात गेल्या 10 वर्षांपासून एसटी बस येत नाही. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.
गावात महाविद्यालय नाही, त्यामुळे मुलांना शिक्षणासाठी परगावी जाण्यासाठी खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागतो.तशीच अवस्था गावकऱ्यांची आहे.