मुंबई : मुंबई आणि ठाण्यासाठी उद्या रेड अलर्ट देण्यात आला होता. मात्र, तो आता ऑरेंज अलर्टमध्ये बदलवण्यात आला आहे. अरबी समुद्रातील सायक्लॉनिक सर्क्युलेशन कमकुवत झाल्याने अलर्ट बदलवण्यात आला आहे. ज्यात मुख्य: पावसाचा अधिकतम पट्टा हा मुंबईच्या दक्षिणेत सरकल्याने रायगड आणि रत्नागिरीत अतीतीव्र पावसाची शक्यता आहे. दरम्यान, असं जरी असलं तरी उद्याला मुंबई आणि उपनगरात तीव्र पाऊस अपेक्षित आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट कायम ठेवण्यात आल्याने तेथील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गात उद्या ऑरेंज अलर्ट असल्याने काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोकणसह मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पुढील तीन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
13 आणि 14 जून मुंबईत हाय अलर्ट
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात 13 आणि 14 जून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या आणि परवा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि पश्चिमी वाऱ्यांनी जोर पकडला आहे त्यामुळे कोकणात पाऊस असेल, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
पुढील तीन तासात उत्तर रायगड, पनवेल आणि मुंबईतील पूर्व उपनगरात वीजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच ठाणे, पालघर आकाश ढगाळ असल्याने काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबईत यावर्षी पावसाने जून महिन्याची सरासरी पहिल्या 10 दिवसांतच ओलांडली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार मुंबई उपनगरातील पावसाची सरासरी संपूर्ण जून महिन्यासाठी 505 मिलीमीटर आहे. मात्र यंदा 1 ते 11 जून, सकाळी 8.30 वाजेपर्यंत उपनगरात 534.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.