Mumbai Rain: मुंबईत रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सकाळी सहा वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Rain) सुरू असून पुढील दोन दिवस पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. मुंबईला आज दुपारपर्यंत रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला होता. पण पावसाचा वाढता जोर पाहून हवामान विभागाने रेड अलर्टचा कालावधी वाढवला आहे. सध्याच्या पावसाचा जोर पाहता उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत रेड अलर्ट वाढवण्यात आला आहे.
मुंबई शहरासह उपनगरात दमदार पाऊस
मुंबईत सकाळपासून सतत पावसाच्या सरी कोसळत असल्याने सखल भागात पाणी साचलं आहे. तर मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देखील देण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. दादर, अंधेरी, कुर्ला, पवई, भांडुप, घाटकोपरसह वसई-विरारला देखील पावसाने चांगलंच झोडपलं आहे. ठाणे, कल्याणमध्ये देखील पावसाची तुफान फटकेबाजी सुरू आहे.
लोकल वाहतूक धिम्या गतीने सुरू
मुंबई शहरासह उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मुंबई परिसरातील सखल भागांत पाणी साचलं आहे. जोरदार पावसामुळे लोकल सेवा धिम्या गतीने सुरू (Mumbai Local Update) आहे. मुंबईतील काही परिसरांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. मुंबईला देण्यात आलेला रेड अलर्ट उद्या सकाळपर्यंत वाढवण्यात आल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडावं, अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.
पुढील तीन ते चार तास महत्त्वाचे
मुंबईसह ठाण्यात पुढील तीन ते चार तास मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडणं टाळा, अशा सूचना हवामान विभागाने केल्या आहेत. पुढील काही तासांत नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
उल्हास नदीला पूरसदृश्य परिस्थिती
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये सकाळपासून प्रचंड पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर जवळील बारवी धरण देखील जवळपास धोक्याच्या पातळीपर्यंत भरलं आहे, त्यामुळे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडले जातील आणि बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल.
हेही वाचा:
Palghar Rain: धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा