मुंबई : राज्यात सध्या थंडीची चाहूल लागली आहे. पण राज्यात थंडीच्या आधी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावल्याचं चित्र आहे. त्यातच मुंबईसह (Mumbai) पालघरमध्येही (Palghar) पुढील चार तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 3-4 तासांत मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान पालघमध्येही पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरुये. तसेच आज आणि उद्या म्हणजे रविवार 26 नोव्हेंबर आणि सोमवार 27 नोव्हेंबर रोजी पावसाचा यलो अर्लट देण्यात आलाय. अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसाचा जिल्ह्यात सुरू असलेल्या गवत पावळी खरेदी केंद्रांना मोठा फटका पडलाय.
मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन
मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. पुढच्या 3 ते 4 तासांच मुंबई आणि पालघरमध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मध्यम तीव्रतेचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असा सल्ला देखील हवामान खात्यानं दिला आहे.
राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात देखील उद्या आणि परवा विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गारपिटीपासून पिकांना वाचवण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (5 ते 6 डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांगलादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळं महाराष्ट्राला त्याचा धोका नाही. सध्या एल निनो मध्यम तीव्रतेत आहे. मध्यम का असेना पण त्याचे अस्तित्व आहे. शिवाय पावसासाठी पूरक ठरत असतो तो धन आयओडी पुढील महिन्यात डिसेंबरअखेर नामशेष होण्याच्या मार्गांवर असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. तसेच एमजेओ सध्या फेज 2 मध्ये असून तो माघारी फिरुन 6 मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं डिसेंबरमधील चंपाषष्टी दरम्यान पडणाऱ्या पावसाची शक्यताही मावळली असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.
हेही वाचा :
सावधान! पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, 'या' भागात अवकाळीसह होणार गारपीट