Mumbai Pune Express Highway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टँकरचा अपघात झाला आणि टँकरने जागीच पेट घेतला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. काही वेळापूर्वी पाऊस आल्याने टँकरची आग  आटोक्यात आली होती मात्र अजून या आगीचा भडका उडला. दोन तासांपासून आग धुमसत आहे. याच टँकरच्या मागे असलेल्या गाडीतील चालकाने बर्निंग टँकरचा थरार सांगितला आहे. 


'या घाटाजवळ तीव्र उतार आहे. भरधाव वेगात हा ऑईलचा टँकर जात होता. त्यावेळी अचानक टँकरचा ताबा सुटला. त्यानंतर टँकरमधील ऑईल महामार्गावर असलेल्या होर्डिंगवर पडलं.  टँकर कठड्याला जाऊन झडकला आणि पलटी झाला. त्यानंतर या टँकरमध्ये असलेल्या ऑईलने लगेच पेट घेतला. आमची गाडी या टँकरच्या मागेच होती. हा सगळा थरार पाहून आम्हीदेखील प्रचंड घाबरलो', असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. 


हा अपघात साधारण बाराच्या सुमारात झाला. या टँकरमध्ये मिथाईल केमीकल होतं. त्यामुळे टँकरने अचानक पेट घेतला. ब्रिजच्या खाली गावातील प्रवासी होते. त्यांच्या कामासाठी जात असावे. लागलेल्या आगीचा गोळा त्यांच्या अंगावर पडला त्यामुळे दोन मुलं आणि एक महिला जखमी झाली आहे. तिघांवरही उपचार सुरु आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 


वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय


ब्रिजवरील ऑईल टँकरला भीषण आग लागल्याने ब्रिजच्या खालीदेखील या आगीच्या झळा पोहचल्या. त्यासोबतच ब्रिजच्या खालच्या दोन ते तीन गाड्यांना देखील आग लागली. ऑईल टँकरला आग लागल्याने  पुन्हा स्फोट झाला. असं असलं तरी मागील तासाभरापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरु असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पावसाने हजेरी लावल्याने आग आटोक्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही वेळापूर्वी पुलावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यात येत होती. मात्र आज धुमसत असल्याने आणि भडकल्याची भीती असल्याने मुंबई दिशेने येणारी वाहतूक आणि पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद ठेवण्याचा घेण्यात आला आहे.


प्रवासी ताटकळले...


पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर केमिकल टँकरला आग लागल्यानं अनेक प्रवासी तीन तासंपासून ताटकळत आहेत. यातच हजला जाणारे मुस्लिम बांधव फसले आहेत. साताऱ्यातून हे ते सकाळी 8 वाजता निघालेत आणि मुंबईच्या विमानतळावर चार वाजता पोहचायचं आहे. हजला जाण्यासाठी त्यांनी सहा लाख भरलेत. ते पोहचू शकले नाहीत तर हजला जाण्याची आलेली संधी हुकणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.