Mahavikas Aghadi Mahamorcha : राज्यातील विविध प्रश्नांवरुन महाविकास आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या उद्याच्या मुंबईतील मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. हा मोर्चा शांततेत आणि नियमांचे पालन करुन काढावा असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. महाविकास आघाडीला उद्याच्या मोर्चासाला पोलिसांनी काही अटींच्या आधारे परवानगी दिली आहे.  


गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत होत असलेली आक्षेपार्ह वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मित्रपक्ष देखील सहभागी होणार आहेत. परंतु, मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काही अटींच्या आधारे मोर्चाला लेखी परवानगी दिली आहे. 


काय आहेत अटी?


दोन समाजात तेढ निर्माण होईल असं कोणतंही भाष मोर्चाला मार्गदर्शन करताना नेत्यांनी करू नये.


मोर्चातील भाषणात कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य करू नये.    


मोर्चात आर्म अॅक्टनुसार चाकू, तलवार आणि इतर कोणतंही घातक शस्त्र वापरू नये.  


मोर्चा दरम्यान कुठेही फटाके फोडू नये.


दिलेल्या मार्गानुसारच मोर्चा पुढे जायला हवा.


कायदा व सुव्यवस्थे  उल्लंघन होणार नाही व सर्व नियमांचे पालन करावे अशा अटीच्या आधारे मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे.


असा असणार पोलिस बंदोबस्त


महाविकास आघाडीच्या महामोर्चाला दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात दोन अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह 8 ते 10 पोलिस उपायुक्त यांच्याद्वारे हा बंदोबस्त हाताळण्यात येणार आहे. सोबतच या मोर्चात SRPFच्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात येणार. तसेच ड्रोनच्या माध्यमातून पोलिस मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत.  


महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी


महाविकास आघाडीकडून उद्या हल्लाबोल महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. त्यासाठी जय्यत तिन्ही पक्षांकडून तयारी करण्यात आली आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स ॲंड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. या संपूर्ण रस्त्यात तिन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. भायखळा ते टाइम्स बिल्डिंगपर्यंत साडे तीन किलोमिटरचं हे अंतर आहे. गाडीतून प्रवास केल्यास हे अंतर कापायला 15 मिनिटांचा अवधी लागतो. लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त बघायला मिळेल. त्यामुळे पायी जाताना हे अंतर कापायला साधारण 30-35 मिनिटांचा कालावधी महाविकासआघाडीच्या नेत्यांना लागू शकतो.   


महत्वाच्या बातम्या


मला खात्री आहे, 'त्या' गृहस्थांबद्दल केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार