मुंबई वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराची धडक, कॉन्स्टेबल जखमी
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2016 12:58 PM (IST)
मुंबई : मुंबईतील वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या निधनाला चोवीस तास होत नाहीत, तोच पुन्हा एकदा मुंबई वाहतूक पोलिसावर दुर्दैवी वेळ ओढावल्याचं वृत्त आहे. कर्तव्य बजावत असताना एका वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात बैलबाजार पोलीस चौकीजवळ पोलिस कॉन्स्टेबल देवीदास निंबाळकर दुपारी 1.50 वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी करत होते. त्यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला थांबण्याचा इशारा त्यांनी केला. मात्र दुचाकीचालक इम्तियाज खान यानं त्यांना चकवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी इम्तियाजने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करणारे पोलीस हवालदार निंबाळकर यांना धडक दिली. यात देवीदास निंबाळकर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी पाठलाग करुन आरोपी इम्तियाज खानला ताब्यात घेतलं आहे.