मुंबई : मराठा आंदोलकांनी (Maratha protest) घराची जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड केल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीडचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. बीडची घटना म्हणजे गृहखात्याचे पूर्णपणे अपयश आहे. ज्या घटना घडल्या त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला. आक्रमक मराठा आंदोलकांनी दोन दिवसापूर्वी बीडमधील (Beed) माजलगावमध्ये (Majalgaon)  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Ajit Pawar Group MLA Prakash Solanke) यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच, सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही पेटवल्या होत्या. याबाबत प्रकाश सोळंके यांनी त्या दिवशी काय काय घडलं हे मुंबईतील पत्रकार परिषदेत सविस्तर सांगितलं. 


"जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे लोक देखील होते. माझे 30 वर्षांपासूनचे राजकीय विरोधक होते. यासोबतच त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. जे 300 जण आले होते ते तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते", असा खळबळजनक दावा प्रकाश सोळंके यांनी केला. 


प्रकाश सोळंके नेमकं काय म्हणाले? 


गेल्या 2 महिन्यापासून मराठा आरक्षण विषय सूरू आहे. राज्यभरात आंदोलनं सुरु आहेत. देशात आणि राज्यात आंदोलन होतं आहेत. बीड जिल्ह्यात वातावरण गंभीर आहे. 2011 पासून जरांगे आरक्षण विषयावर काम करत आहेत. संपूर्ण मराठा समाज त्यांच्या नेतृत्वात एकवटला आहे. अतिशय प्रामाणिक आणि अभ्यासपूर्ण व्यक्ती म्हणून ते पुढे येत आहे. त्यांचं नेतृत्व एक आश्चर्य आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. मी या आंदोलनात मागील 2 महिन्यापासून सहभागी आहे. 


मी माजलगाव मतदारसंघाचा आमदार आहे. आमदार होण्यापूर्वी पंचायत समिती सभापती जिल्हापरिषद सदस्य देखील होतो. माझे वडिल जिल्हा परीषद अध्यक्ष होतें. 1967 ते 80 ते राज्यमंत्री, मंत्री देखील होते. मी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे.


1987 ते 2023 माझा 36 वर्षाचा अनुभव आहे. माजलगाव मतदारसंघात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 


30 ऑक्टोबरला मी घरातच होतो. माजलगाव बंद करण्यात आले होते त्यावेळी 5 हजार तरुण आले होते. साडे दहा वाजता काही तरुण आले आणि त्यांनी मला हा सर्व जमाव माझ्या घरावर येणारं आहे अशी माहिती दिली. मी तरिदेखील तिथच थांबलो. मी त्यांच्याशी बातचीत करावी यासाठी मी थांबलो. माझ्या घरावर जोरदार दगडफेक करण्यात आली. जमावामध्ये मराठा समाजा व्यतिरिक्त इतर जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे लोक देखील होतें. माझे 30 वर्षांपासूनचे राजकिय विरोधक होते. यासोबतच त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. जे 300 जण आले होतें ते तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठे दगड होते. पेट्रोल बॉम्ब होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते. 


माझं एवढंच मत आहे की 300 लोकं हे अवैध धंदा करणारे, काळाबाजार करणारे आणि माझे विरोधक होते.मी पोलिसांना सीसीटिव्ही फुटेज दिले आहेत. मी पोलिसांकडे मागणी केली आहे की केवळ दोषींवर कारवाई करा. सरसकट कारवाई नको.


राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत अनेकवेळा मी चर्चा केली आहे. 


माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी मराठा आरक्षणासाठी कालबध्द कार्यक्रम द्यावा. आरक्षण कसं देणारं आहेत याबाबत देखील खुलासा करावा. 


हल्ला करणारे आहेत हे कुठल्या पक्षाचे आहेत हे माहिती नाही. 


आत्ता पर्यंत 21 लोकांना अटक झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजचा आधार आहेच. 8 आरोपी मराठा आंदोलकांनाव्यतिरिक्त आहेत. 


ऑफिस आणि घराचं संपूर्णपणे नुकसान झालंय.  मी अजूनही तक्रार दिली नाही. 


हे गृहखात्याचं अपयश - प्रकाश सोळंके


बीडची घटना म्हणजे गृहखात्याचे पूर्णपणे अपयश आहे. ज्या घटना घडल्या त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मला असं वाटतंय की,  पोलिसांचे मनोधैर्य जालना घटनेनंतर कमी झालंय. ते वाढवणं गरजेचं असल्याचं म्हणत प्रकाश सोळंके यांनी गृहखात्याला या घटनेसाठी जबाबदार धरलं.


प्रकाश सोळंकेच्या घराची तोडफोड


आक्रमक मराठा आंदोलकांनी दोन दिवसापूर्वी म्हणजेच 30 ऑक्टोबरला बीडमधील (Beed) माजलगावमध्ये (Majalgaon)  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Ajit Pawar Group MLA Prakash Solanke) यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच, सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही पेटवल्या होत्या.  साधारणतः दीड तास आंदोलकांकडून आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक सुरू होती. आंदोलकांनी सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही जाळल्या. प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यातून धुराचे लोळ येत असल्याचं पाहायला मिळत होते. त्यावेळी आमदार प्रकाश सोळंके घरातच उपस्थित होते. 


फोन कॉलनंतर दगडफेक 


प्रकाश सोळंकेंनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. 


सोशल माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. एका मराठा आंदोलकानं प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. याच ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यावर आक्रमक आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली.