मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राहत असलेल्या लुईसवाडी भागात पोलीसांनी सर्व सामन्यांसाठी रस्ता बंद केला. यावरुन सोशल मीडिया आणि विरोधकांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या प्रकरणी रात्री उशिरा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि हा रस्ता खुला करण्यात आला. मात्र या रस्त्यावरून वातावरण तापले आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सर्व्हिस रोड सामान्यांसाठी बंद करण्यात आला होता यावरुन संजय राऊत यांनी टीका केली. यावरून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी निशाणा साधला आहे. मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी तुमच्या डोळ्यांना दिसत नाही का? असा सवाल करत भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरून (पूर्वीचे ट्विटर) पलटवार केवा आहे.
चित्र वाघ म्हणाल्या, मुंबईतील कलानगरचा किल्ला आणि त्याची तटबंदी तुमच्या डोळ्यांना दिसत नाही का? ठाकरे राज परिवाराच्या मातोश्री नामक किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी किती पोलीस पहारे, किती नाकाबंदी आणि किती अडथळे पार करावे लागतात, हे जनतेला कळू द्या. सर्वसामान्यांसाठी मातोश्रीसमोरचा रस्ता कशामुळे बंद असतो, हे देखील जनतेला एकदा सांगा.
देवेंद्र फडणवीस भेदभाव करत नाहीत : चित्रा वाघ
कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी मुख्यमंत्र्याच्या घरासमोरील सर्व्हिस रोड बंद करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात हिंसाचार आहे तर बलात्कार होत आहेत भ्रष्टाचार आहेत तिथे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे. ही पोलिसांची ही चाटुगिरी आहे अशी टीका संजय राऊतांनी केली होती. त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकास एक आणि दुसऱ्यास दुसरा, असा भेदभाव करत नाहीत. हे आपल्याच उदाहरणावरून कळाले असेलच. तुमची महाज्ञानी टिवटिवही देवेंद्रजींच्या सुरक्षाव्यवस्थेच्या छत्रछायेत चाललेली असते, याचा विसर पडू देऊ नका. तुमच्या सरकारच्या गृहमंत्र्यांनी वसुली धंदे केले देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचे पोलीस कुणाचे मिंधे नाहीत.
काय म्हणाले होते संजय राऊत?
ठाण्याच्या लुईस वाडी भागात औट घटकेचे व्हीआयपी राहतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत (CM Eknath Shinde) असलेल्या लुईस वाडी भागात पोलीस बंदोबस्त वाढवला शिवाय या भागातील रस्ताही बंद करण्याची अधिसूचना काढली. सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही.सोशल मीडिया आणि विरोधकांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. या प्रकरणी रात्री उशिरा खासदार शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. यावर संजय राऊत म्हणाले. औट घटकेचे ते व्हीआयपी त्या ठिकाणी राहतात. त्यांच्यासाठी अशा प्रकारचे जर निर्देश काढले असतील तर पोलिसांची ही चाटुगिरी आहे. पोलीस चाटुगिरी करत असल्याचे स्पष्ट दिसून येतं. महाराष्ट्रात हिंसाचार आहे तर आहेत बलात्कार आहेत भ्रष्टाचार आहेत तिथे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे