मुंबई : मुंबई ते गोवा हायवेचं पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचं काम 2017 च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, मुंबई-गोवा हायवे हा ‘ग्रीन हायवे’ करण्याचा मानस आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.
मुंबई गोवा हायवेवर रस्त्याच्या दुतर्फा आणि मधल्या डिव्हायडरमध्ये झाडे लावण्यात येणार असून, हा संपूर्ण महामार्ग हा 'ग्रीन हायवे' करण्यात येणार आहे. यासाठी 150 ते 200 कोटी खर्च करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आशिष शेलार हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचीही या दौऱ्यादरम्यान भेट घेतली.
मुंबई-गोवा हायवेच्या पहिल्या टप्प्यातील पनवेल ते इंदापूर या महामार्गाचे काम हे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यातच या महामार्गावर अपघातांची संख्या वाढत असून, गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गाच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.
नितीन गडकरी यांनी आज महाडनजीकच्या सावित्री नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामाची हवाई पाहणी केली असून, जून 2017 पर्यंत नवीन पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. तर पुढील वर्षभराच्या आत मार्च 2018 पर्यंत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करणार असून 2018 पूर्वीच हे काम पूर्ण करणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.