Mumbai-Solapur Vande Bharat :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दोन नवीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. मात्र, मुंबई-सोलापूर या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस गुरुवारी धावणार नसल्याने अक्कलकोट आणि गागणापूर येथे जाणाऱ्या भक्तांना या ट्रेनचा फायदा होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गुरुवारीदेखील वंदे भारत चालवण्याची मागणी होऊ लागली आहे. 


मुंबईत वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांनी या नव्या ट्रेन व्यावसायिकांसोबत शेतकरी, पर्यटक आणि भाविकांना फायदेशीर ठरतील असे म्हटले होते. मात्र, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसही गुरुवारी धावणार नाही. देखभालीसाठी गुरुवारी या ट्रेनला विश्रांती देण्यात आली आहे. 


अक्कलकोट आणि गाणगापूरमध्ये भक्तांची गुरुवारी गर्दी


अक्कलकोट स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी गुरुवारचा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. तर, गाणगापूर हे दत्तभक्तांसाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्यादृष्टीनेदेखील गुरुवारचा दिवस महत्त्वाचा आहे. मात्र, गुरुवारी वंदे भारत एक्स्प्रेसला सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी विशेष दिवशी अक्ककोट आणि गाणगापूरमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या भक्तांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. मंगळवार आणि शुक्रवार हे वार तुळजापूरसाठी महत्त्वाचे आहेत. या दिवशी देवीच्या भक्तांची तुळजापूरमध्ये मोठी गर्दी असते. त्यांच्यादृष्टीने वंदे भारत एक्स्प्रेसचा मोठा फायदा होणार आहे. 


स्वामी समर्थ मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी म्हटले की, अक्कलकोट वटवृक्ष स्वामी समर्थांचा वार हा गुरुवार आहे. दर गुरुवारी मंदिरात महाराजांचा पालखी सोहळा पार पडत असतो. रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत हा पालखी सोहळा असतो. आठवड्यात गुरुवारी तसेच शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये स्वामी भक्तांची मोठी गर्दी मंदिरात असते. भाविकांना गुरुवारी मंदिरात येता यावं यासाठी वंदे भारत एक्सप्रेस चे नियोजन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.


तर, वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याने स्वामी समर्थ भक्तांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले यांनी म्हटले. मुंबईहून अक्कलकोट येणाऱ्या भक्तांना रेल्वे ही सोलापूर पर्यंतच असल्याने त्रास सहन करावा लागतो. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याने मुंबईहून सोलापूरला येण्यासाठी आधीपासून असलेली सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा हा अक्कलकोटला देखील देण्यात यावा. सिद्धेश्वर एक्सप्रेस शेवटचा थांबा हा सोलापूर न करता अक्कलकोट केल्यास स्वामीभक्त हे थेट अक्कलकोटपर्यंत येऊ शकतात. तसेच रात्री परत निघणारी गाडी हे देखील अक्कलकोट स्थानकावरच निघावी. यामुळे भक्तांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे त्यांनी म्हटले. 


पर्याय काय


मुंबई-सोलापूर मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेससाठी एकच रेक आहे. त्यामुळे मुंबईहून सोलापूर येथे दाखल झालेली एक्स्प्रेस पुन्हा सोलापूरहून परतीचा प्रवास करते. त्यामुळे गाडीची देखभाल, दुरुस्तीसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. गुरुवारी ही एक्स्प्रेस चालवायची असल्यास रविवारी एक्स्प्रेस चालवू नये असे मत समोर येत आहे.  रविवारी मुंबईतून गाडी सुटणार नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सोमवारी सोलापूरमधून वंदे भारत सुटणार नाहीत. रविवारनंतर सोमवारी मुंबईच्या दिशेने येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना सिद्धेश्वर एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेसचा पर्याय उपलब्ध असल्याचे म्हटले जात आहे.  


वंदे भारत गाडीच्या वेळेत बदल करा; खासदार जयसिद्धेश्वर यांची मागणी


वंदे भारत रेल्वेच्या मुंबई येथुन सुटण्याच्या वेळेत बदल करावा असे निवेदन खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी रेल्वेमंत्री यांच्याकडे केली आहे. मुंबईतून सोलापूरला येणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या वेळेत बदल करून दुपारी चारऐवजी संध्याकाळी सहा वाजता मुंबईहून सोडावी, जेणेकरून सकाळी सोलापुरहून आलेल्या व्यापारी, इतर लोकांना मुंबईतील त्यांची कामे उरकून संध्याकाळी पुन्हा सोलापूरकडे रवाना होता येईल असे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजींनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले. मुंबई येथुन रेल्वे गाडी सुटण्याच्या वेळेत बदल करण्याबाबत खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीच्या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले.