मुंबई / ठाणे : मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरात गेल्या काही तासांपासून धुंवाधार पाऊस सुरु आहे.सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईच्या उपनगरांतील अनेक भागात पाणी साचलं आहे.


सूर्यदर्शन टॉवरमागील भिंत कोसळली :



ठाण्यात पावसामुळे नितीन कंपनीजवळ सूर्यदर्शन टॉवर कंपनी जवळ इमारतीची भिंत कोसळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही भिंत कोसळल्यामुळे परिसराती काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे.


मध्य रेल्वे विस्कळीत, पारसिक बोगद्याजवळ ट्रॅकवर पाणी


 
ठाण्यातील जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. पारसिक बोगद्याजवळ ट्रॅकवर पाणी आणि माती आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती आहे. सीएसटीकडे जाणारी मध्य रेल्वेची जलद वाहतूक सध्या धीम्या मार्गावरुन वळवण्यात आली आहे.


 

 

जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेचा आजचा मेगाब्लॉक रद्द झाल्याची माहिती रेल्वेचे वरिष्ठ पीआरओ ए. के. जैन यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.

 
दरम्यान, या पावसाचा लोकल सेवेसोबत रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. ठाणे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. घोडबंदर रोड आणि आनंदनगर भागात ट्राफिक जाम झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांसोबत पादचाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.

 
ठाणे रेल्वे स्थानकातही पावसामुळे प्रचंड पाणी साचलं आहे. सकाळपासून कल्याण, ठाणे, मुलुंड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

 

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, सात जणांचा मृत्यू


 

 

भिवंडीतील गैबीनगर परिसरात एक दुमजली इमारत पडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 
या इमारतीमध्ये नऊ ते दहा कुटुंबं राहत होती. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे इमारत खचली होती. त्यानंतर इमारत पडून 30 ते 35 जण अडकल्याची भीती आहे.