मुंबई : सध्या राजकीय वर्तृळात आणि व्यावसायिक वर्तृळात दोन भेटींची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे- गौतम अदानी भेट झाली होती. तर दुसरीकडे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-मुकेश अंबानी यांची भेट झाली. महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात जात असल्याची टीकेची झोड उठत असतांना दोन प्रमुख राजकीय प्रतिस्पर्ध्यांची देशातील दोन सर्वात बड्या उद्योजकांनी घेतलेल्या या भेटीगाठीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्यामुळे राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार हिरवला गेला असल्याची टीकी झाली होती. अशातच महाराष्ट्रातील सध्याच्या प्रमुख दोन राजकीय प्रतिस्पर्ध्यांना भेटायला देशातील सर्वात बडे उद्योजक पोहोचले.
उद्योगपती गौतम अदानी यांनी 20 सप्टेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. तर उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शनिवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावर भेट घेतली. दोन्ही भेटींमध्ये जवळपास तास दीडतास चर्चा झाल्या. मात्र या दोन्ही भेटींचे तपशील अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि सोबत आणखी काही व्यक्ती देखील होत्या. रात्री 12.15 वाजेच्या दरम्यान अंबानी कुटुंबीय वर्षा बंगल्यावरुन बाहेर पडलं. अत्यंत गुप्त पद्धतींनी झालेल्या या भेटींबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सध्या दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. राज्यातल्या दररोज वेगवेगळे राजकीय वादंग सुरु असतांनाच महाराष्ट्रातले उद्योग, गुंतवणूकसुद्धा राज्याबाहेर चाललीय. याच पार्श्वभूमीवर देशातील दोन प्रमुख उद्योजक दोन नेत्यांना भेटायला गेले. त्यामुळे चर्चा तर होणारच.
नुकताच अदानी आणि अंबानी यांच्यामध्ये देखील एक करार झाला आहे. गौतम अदानी यांच्या अदानी आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स या देशातील मोठ्या व्यावसायिक समूहांनी एक करार केला आहे. या करारांतर्गत त्यांच्या रिलायन्स आणि अदानी कंपन्यांमध्ये एकमेकांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीत कामावर ठेवू शकणार नाहीत. 'नो पोचिंग करार' असे या कराराचे नाव आहे. यातच या दोन उद्योजकांनी राज्यातील दोन बड्या नेत्यांची भेट घेतल्यानं चर्चा रंगली आहे.