ST Buses For Holi Festival :  होळीनिमित्त (Holi Celebration) कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नियमित बसेस व्यतिरिक्त 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या अतिरिक्त बसेस 3 मार्च ते 12 मार्च 2023 दरम्यान कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.


गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो नागरिक कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली आहे. एसटी महामंडळाने यंदा 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवानिमित्ताने जादा बसेस सोडण्यात येतात. या बस सेवेला कोकणवासियांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. होळी निमित्त होणाऱ्या जादा बसेसलादेखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो.


कोणत्या आगारातून सोडण्यात येणार जादा बसेस


मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून  खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी ठिकाणांसाठी या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. 


कुठं कराल आरक्षण?


आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच  Msrtc Mobile Reservation App तिकीट आरक्षित करता येईल. त्याशिवाय, एसटी आगारातून ही या विशेष बसेससाठी तिकीट आरक्षण करता येईल. सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसमधून प्रवास करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. 



मुंबई-पुणे मार्गावर धावणार 100 शिवाई बस


 मुंबई-पुणे  (Mumbai - Pune) मार्गावर पुढील दोन महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाच्या 100 शिवाई बसेस धावणार आहेत. मुंबई-पुणे मार्गावर सध्या धावत असलेल्या शिवनेरी बस (Shivneri Bus)  हळूहळू थांबवण्यात येतील. ‘शिवाई’ बसेस (Shivai Bus)  या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस असून, त्यांना एशियाड बसचा लूक देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘शिवाई’ बसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा लूक देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. नव्याने रुजू झालेली शिवाई ही  इलेक्ट्रिक बस आहे. त्यामुळे याचे तिकीटदर कमी असणार आहे. साधारण 300-350 रुपये तिकीट भाडं असण्याची शक्यता आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: