Continues below advertisement

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर गावी जाणाऱ्या एसटी प्रवाशासांठी (ST Bus) मोठी आहे. एसटी महामंडळाकडून (MSRTC) करण्यात आलेली प्रस्तावित 10 टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निर्देशानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी या भाडेवाढीची घोषणा करण्यात आली होती, तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाने दिवाळीच्या तोंडावर, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या दरम्यान 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याची घोषणा केली होती. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवाशी एसटीचा प्रवास करतात. त्यामुळे या काळात महसूल वाढीसाठी महामंडळाने हा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.

Continues below advertisement

ST Bus Fare Hike News : एकनाथ शिंदेंचे निर्देश

दिवाळीसाठी करण्यात आलेली एसटीची भाडेवाढ तत्काळ रद्द करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. महाराष्ट्रातील सध्याची पूर परिस्थिती लक्षात घेऊन ही भाडेवाढ रद्द करावी असे एकनाथ शिंदे यांनी सुचविले होते. त्यावर प्रताप सरनाईक यांनी ही भाडेवाढ रद्द करण्याचे एसटी प्रशासनाला आदेश दिले.

ST Bus Fare In Diwali : दिवाळीमध्ये प्रवाशांच्या संख्येत वाढ

दिवाळी सणासाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. सध्या चारचाकी खासगी वाहने वाढली असली तरीही एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळेच एसटी प्रवासाला प्राधान्य दिले जाते.

या आधी एसटी महामंडळाने 10 टक्के भाडे वाढ प्रस्तावित केली होती. वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी 10 टक्के दरवाढ लागू करण्यात येणार होती. त्यामुळे, गावखेड्यापासून ते रातराणीने लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार होता.

आधीच राज्यातील बळीराजा अतिवृष्टीने खचून गेलेला असताना, आता दिवाळीपूर्वीच सार्वजनिक वाहतूक प्रवासाच्या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार होता. परंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

ही बातमी वाचा: