मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळानं 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या तसंच फिरण्याचे बेत आखणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.


आज शनिवारी मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू असेल. यात साध्या बससाठी 10 टक्के, निमआराम म्हणजेच शिवनेरी बससाठी 15 टक्के आणि शिवशाही बससाठी 20 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

ही भाडेवाढ 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत वैध असेल. गेल्या तीन वर्षांपासून एसटी दिवाळीच्या काळात हंगामी भाडेवाढ करते.

खासगी बसचालकांची मनमानी

दिवाळी तोंडावर आली असताना दरवर्षीप्रमाणे खासगी ट्रॅव्हल्सनी प्रवाशांचं दिवाळं काढायला सुरूवात केली आहे. मुंबईसह पुण्यापासून राज्यातल्या प्रमुख शहरांत जाणाऱ्या बससेवेचे दर जवळपास दुपटीनं वाढवण्यात आले आहेत.

दिवाळीच्या सुट्टीत अनेक जण आपल्या गावाला किंवा फिरण्यासाठी जातात. रेल्वेचं रिझर्व्हेशन फुल्ल असल्यामुळे अनेकजण खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडतात. मात्र याचाच गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांचा किसा कापायला सुरूवात केली आहे.

खालील साधारण दर, वाढीव दर स्लीपर बस

मुंबई ते औरंगाबाद - साधारण दर 700 रुपये, वाढीव दर 1200 रुपये

मुंबई ते रत्नागिरी - साधारण दर600 रुपये, वाढीव दर 1200रुपये

मुंबई ते सोलापूर -साधारण दर600, वाढीव दर 1000रुपये

मुंबई ते कोल्हापूर -साधारण दर 600 रुपये , वाढीव दर 1000 रुपये

मुंबई ते नागपूर - साधारण दर 1500रुपये, वाढीव दर  3200 रुपये

मुंबई ते लातूर - साधारण दर 800 रुपये , वाढीव दर 1500 रुपये

मुंबई ते गोवा   - साधारण दर   800 रुपये ,वाढीव दर-  1500 एसी स्लीपर

मुंबई ते हैद्राबाद , बंगलोर - साधारण दर1500 रुपये, वाढीव दर 2200 रुपये

खरंतर सर्व व्यवहार ऑनलाइन झाल्याने तसं म्हंटल तर एजंटकडून प्रवाशांना लुबाडणं कमी झालं आहे. कारण ऑनलाइन दरानेच तिकीट विक्री केली जाते. मात्र, तिकिट विक्री होणाऱ्या ऑनलाइन साईट्सवरच हे दर 30 ते 50 % ने या दिवाळीच्या दिवसात वाढविण्यात आले आहेत.