मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असून राज्य सरकारने त्यांच्यासाठी 6 हजार रुपयांच्या बोनसची घोषणा केली आहे. त्याचसोबत कर्मचाऱ्यांना 12 हजारांची उचलही घेता येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हेदेखील उपस्थित होते.
आपल्या मागण्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर संपाचं हत्यार उचलण्याचा निर्णय एसटी कर्मचारी संघटनांनी घेतला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनांसोबत बैठक घेतली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
ST Bus News : 12 हजारांची उचल देण्याचा निर्णय
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी हात खुला करण्यात आला. राज्य सरकारकडून 48 हफ्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 2200 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली.
यंदा दिवाळीनिमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस देण्यात येणार आहे. त्याचसोबत 12 हजार रुपयांच्या उचलसंदर्भात देखील घोषणा करण्यात आली.
ST Protest News : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
दरम्यान, मंगळवारपासून करण्यात येणारं आंदोलन एसटी कर्मचारी संघटनांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नसलो तरी हे आंदोलन मागे घेत असल्याचं कृती समितीने घोषणा केली. उपमुख्यमंत्र्यांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीनंतर कृती समितीने हा निर्णय घेतला आहे.
उद्या पासून होणार एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन मागे..पूर्णपणे समाधानी नसलो तरी उद्याचं आंदोलन न करण्याची कृती समितीची घोषणा.. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर कृती समितीचा निर्णय
ST Workers Protest : काय आहेत मागण्या?
2018 पासून महागाई भत्ता फरक देण्यात आला नसून सन 2020 ते 2024या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत असून एकूण 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीत. थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
'आवडेल तिथे प्रवास' पासच्या दरात कपात
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळीच्या आधी 'आवडेल तिथे प्रवास' योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना खुशखबर दिली आहे. एकूण 20 ते 25 टक्के कपात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
'आवडेल तिथे प्रवास' या योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा मिळते. या योजनेत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कोणत्याही एसटी बसने अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते. एसटीचा चार किंवा सात दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते.
ही बातमी वाचा: