ST Bus Mumbai Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून (Mumbai Pune Express Way) प्रवासी वाहतूक करण्यास काही एसटी बसेसना मनाई केल्यानंतर एसटी महामंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवनेरीसह काही मार्गावरील शिवशाही आणि इतर एसटी बसेसची वाहतूक पूर्वीप्रमाणे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. फक्त ज्या बसचे चालक नियमबाह्य पद्धतीने मार्ग बदलून एक्स्प्रेसवेवरून धावत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.
काही एसटी बसेस या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चालवण्यात येतात. मात्र, यातील काही एसटी बसेस या एक्स्प्रेसवेवरून वाहतूक करतात. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते. त्याशिवाय, प्रवासी भारमानही कमी झाले आहे. अशा एसटी बसबाबत माहिती समोर आल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासनाने काही पावले उचलली आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या मार्गांशिवाय इतर मार्गावरून बस चालवल्यास टोलच्या रक्कमेतील फरक आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते.
मुंबईहून पुणे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जाण्यासाठी बोरघाटातून नवीन मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग हे दोन रस्ते आहेत. एसटी महामंडळाच्या बहुतांशी बसेस या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून धावतात. तर, काही बसेसना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून (खोपोली-लोणावळा-तळेगाव मार्गे) जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या बसेस या मार्गांवरून जाण्याऐवजी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरून धावतात, असे महामंडळाच्या निर्देशनास आले. त्यानंतर नियमांप्रमाणे वाहतूक न करणाऱ्या एसटी चालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर या बसेस धावणार
एसटी महामंडळाच्या शिवनेरीसह मुंबई-सातारा, बोरिवली-सातारा या मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसेससह अन्य बसेस मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरून पूर्वीप्रमाणेच धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. त्याशिवाय, इतर साध्या बसेस ज्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरून जातात, त्यादेखील पूर्वीप्रमाणे एक्स्प्रेसवरून वाहतूक करतील असे महामंडळाने सांगितले.
प्रवासी भारमान घटले
नवीन एक्सप्रेसवे वरून जाताना पनवेल ते पुणे या तब्बल 130 किलोमीटर अंतरावर एकही प्रवासी चढउतार होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या तुलनेत जुन्या हायवे वरून जाताना खोपोली, लोणावळा, तळेगाव या ठिकाणी प्रवासी भारमान अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता एसटी महामंडळाने जुन्या मार्गावरून एक्स्प्रेसवेवरून एसटी बस चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोणावळा येथे शनिवार- रविवार मोठ्या संख्येने प्रवासी आणि पर्यटक जात असतात. शिवाय इतर दिवशी देखील मोठ्या संख्येने स्थानिक नागरीक प्रवास करत असतात. मात्र परस्पर एक्स्प्रेसवे वरून वाहतूक करणाऱ्या एसटीच्या बसेसमुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन खाजगी वाहनांनी जावे लागते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: