सोलापूर : थकीत वीजबिलाच्या कारवाईबाबत विरोधकांनी राज्य सरकारला टीकेचं लक्ष्य केलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. वाढीव वीज बीलाची शाहनिशा करण्याची गरज आहे असल्याचं सांगताना, ग्राहकांना आलेल्या बीलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा अहवाल एमएसईबीने काढलाय का? तो अहवाल काढण्याबाबत आदेश काढले आहेत का? असं रोहित पवार म्हणाले. तसंच सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.


विजबिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने ग्राहकांना थकबाकी भरण्याचे आवाहन महावितरणने केलं आहे. वेळेवर बिलं नाही भरली तर थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


ग्राहकांना थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन, अन्यथा थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार


यावरुन विरोधकांना सरकारचा समाचार घेतला. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भात भाष्य करण्याचं टाळलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारला वीजबिलाबाबत सरकारला प्रश्न विचारले आहेत.


सर्वसामान्यांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार : रोहित पवार
रोहित पवार म्हणाले की, "वाढीव वीजबीलाची शाहनिशा करण्याची गरज आहे. वाढीव आलेले वीज बील कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढेच बील द्यावे. यासाठी सरसकट धोरण करता येईल का याचा अभ्यास राज्य सरकारने करावा असे मला वाटते. कोरोनाकाळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल. ग्राहकांना आलेल्या बीलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा अहवाल एमएसईबीने काढलाय का? तो अहवाल काढण्याबाबत आदेश काढले आहेत का? ते काढले असतील तर त्याचा अहवाल काय आलाय हे पाहावे लागेल. मी सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे."


ऊर्जामंत्र्यांनी वीज बिलाच्या प्रश्नावर बोलणं टाळलं
एकीकडे महावितरणने राज्यात वीज बिल वसुली सुरु केली असून बिल न भरणार्‍यांचे कनेक्शन तोडले जाणार आहे. तर दुसरीकडे याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मौन बाळगणं पसंत केलं. राऊत काल (20 जानेवारी) मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठकीसाठी आले होते. बैठक संपल्यानंतर माध्यमांनी त्यांना वीज बिल वसुलीबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दुसर्‍या मार्गाने पळ काढला. वीज बिल वसुलीवर बोला असे अनेकदा विचारून काही न बोलता ते निघून गेले.


Electricity Bill | वाढीव वीजबिलाबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून हात वर, सरकार दखल कधी घेणार?