लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात मंगळवारी (19 जानेवारी) झालेल्या दगडफेकीत पाच आरोपी पोलिसांनी अटक केली आहे. साबेर याहिया पटेल, मुसा बागवान, मिर्झा पाशा बेग, शादुल निजाम शेख,अमीर अब्दुल रज्जाक चाऊस अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे अटक केलेल्या आरोपींपैकी एकाकडे चलनातून बाद झालेल्या एक हजारांच्या दहा लाख किंमतीच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या नोटा सापडल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे संदर्भ जोडले गेले आहेत.
दोन दिवसांपूर्वी आर्थिक व्यवहारातून झालेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर जमावाने आक्रमक होत उदगीर येथे दगडफेक केली होती. यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले होते. काही लोक दगडफेकीत जखमी झाले होते. पोलिसांनी दोन दिवसात कसून तपास करत यातील सूत्रधारांच्या मुसक्या आवळल्या.
काय होते प्रकरण?
उदगीर शहरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या हैबतपूर येथे शफी अहमद सय्यद (वय 32) आणि त्यांच्या मित्रामध्ये भांडण झाले होते. शफी सय्यद यांना जास्त मार लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी (19 जानेवारी) त्यांचा मृत्यू झाला. आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. मग पोलिसांनी आश्वसन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, तोपर्यंत शफीच्या नातेवाई आणि मित्रांनी उदगीर शहरात दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये बस, कार या वाहनांचे नुकसान झाले आहे तर अनेकजण जखमीही झाले आहेत. रस्त्यावरुन मार्गस्थ होणारे अनेकजण यामध्ये जखमी झाले होते. उदगीर पोलिसांना काहींना अटक केले आहे. शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. क्षुल्लक कारणावरुन सुरु झालेल्या भांडणाने एकाचा बळी घेतला तर अनेकजण जखमी झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात असून सध्या स्थिती पूर्वपदावर आहे.
पोलिसांनी रस्त्यावरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले यातील दगडफेक करणाऱ्या सूत्रधारांना अटक केली आहे. यात काही जणांची राजकीय पार्श्वभूमी आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी निगडित असलेले हे लोक अचानकपणे एकत्र का आले? उदगीर शहरातील शांतता भंग करण्यामागे यांचा नेमका काय उद्देश होता? या मागे कटकारस्थान कोणी आणि का केले होते याचा तपास आता लातूर पोलीस करत आहेत. दगडफेकीची घटना घडल्यापासून लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव आणि पोलीस उप अधीक्षक सचिन सांगळे यांनी उदगीरात जातीने तपास कामात सक्रिय सहभाग घेतला आहे.
Stone Pelting in Udgir | आर्थिक व्यवहारातून मारहाण, एकाचा मृत्यू; मृताच्या नातेवाईकांकडून दगडफेक