सोलापूर : कोणत्याही पद्धतीचा वापर नसताना तब्बल तीन लाख 44 हजारांचे वीज बिल पाठवल्याचा प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. सोलापुरातील मिनाक्षी साने विडी घरकुल परिसरात हा प्रकार घडलाय. 2018 साली मिनाक्षी साने विडी घरकुलात सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत कनेक्शन देण्यात आले. त्यामध्ये लता मडूर यांना देखील मोफत कनेक्शन देण्यात आले. मात्र, काही कारणात्सव चार महिने त्या घरात राहायला आल्याच नाहीत. मात्र, या चार महिन्यात देखील त्यांना भरमसाठी बिल आकरण्यात आले होते.


यामुळे लता मडूर या त्या घरात राहयला गेल्याच नाहीत. महावितरणाकडे या प्रकाराची तक्रार देखील देण्यात आली. त्यानंतर मीटर फॉल्टी असल्याचे सांगत मागील आठ महिन्यांपूर्वी हे मीटर महावितरने काढून देखील नेले. 2018 पासून या घरात कोणीही राहत नसले आणि आठ महिन्यांपासून मीटर नसले तरी तब्बल 3 लाख 44 हजार रुपयांचे बील पाठवल्याचे उघड झाले आहे. माकपच्या कार्यकर्त्यांनी पुराव्यासह हा सगळा प्रकार उघडकीस आणला आहे. तर यासारखे अनेक प्रकार विडी घरकुल परिसरात घडले असून अनेक मीटरमध्ये बिघाड असल्याचा आरोप माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला आहे.



अशाच पद्धतीने गोदुताई विडी घरकुल परिसरात राहणाऱ्या कलावती शंकर चिप्पा यांना देखील महावितरणने चुकीचे बिल पाठवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चिप्पा यांनी घरकुल परिसरात काही वर्षांपूर्वी घर खरेदी केले होते. सर्व कागदोपत्री काम झाली आहेत. मात्र, काही कारणामुळे वीजेचे कनेक्शन हे अद्याप जुन्याच मालकाच्या नावाने आहे. ऐरवी सरासरी 1 हजार रुपयांच्या आसपास बिल येणाऱ्या चिप्पा यांना तब्बल 47 हजार रुपयांचे बिल लॉकडाऊनच्या काळात वापरलेल्या वीजेसाठी आले आहे.



विडी घरकुल परिसरात राहणाऱ्या अनेक कुटुंबियांचे उत्पन्न हे अत्यल्प आहे. रोजच्या कमाईवर जेवणाची सोय होते. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक झळा सोसलेल्या या कुटुंबियांनी भरमसाठ बिलं भरायची कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. तर घरकुल परिसरात राहणाऱ्या 20 विडी कामगारांपैकी अनेकांच्या बिला संदर्भात समस्या आहेत. त्यामुळे हे सर्व तपासणीचे काम हातात घेतले असून 26 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली.



गोदाताई घरकुल परिसरात 822 विद्युत मीटर फॅाल्टी असून तातडीने बदलावे, या परिसरात जवळपास 11 हजार विद्युत ग्राहक असून या ठिकाणी स्वतंत्र शाखा कार्यालय सुरु करावे, 11 हजार विद्युत ग्राहकांच्या विद्युत मीटरची तपासणी करून तांत्रिक अडचणी दूर करावी, ग्राहकांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी 4 ते 5 ठिकाणी विद्युत ट्रान्सफार्मर बसवावे, ग्राहकांचे तक्रार निवारण होण्याकरिता या परिसरात कायम स्वरूपी तक्रार निवारण कक्ष सुरु करावे आणि सौभाग्य योजनेमधील विद्युत कनेक्शन देण्यात आलेले आहेत. त्या ग्राहकांना चुकीच्या विद्युत बिलांची आकारणी आलेली आहे, तरी बिलांची चौकशी होऊन ते बिले दुरुस्त करून द्यावे. इत्यादी मागणी माकपतर्फे करण्यात आली आहे.

दरम्यान या विषयी आम्ही महावितरणची बाजू देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनच्या कालावधीत सरासरी पद्धतीने ग्राहकांना बिले पाठवण्यात आली आहेत. घरकुल मधील काही ग्राहकांच्या तक्रारी असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महावितरणाच्या सोलापूर मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.

Solapur | सोलापुरात वीज बिलाच्या पाच हजार प्रतींची होळी, वाढीव बीज बिलावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक