अकोल्यात थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 23 Mar 2019 06:45 PM (IST)
महावितरण कर्मचारी मंगेश गवई यांच्या फिर्यादीवरुन उमेश चव्हाण यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अकोला : थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला ग्राहकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी अकोला जिल्ह्यातील गावंडगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. सस्ती येथील वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता डी. के. कंकाळ आपल्या पथकासह थकीत विद्युत बिल वसुली करण्यासाठी शनिवारी गावंडगाव येथे गेले होते. गावातील उमेश चव्हाण यांच्याकडेही थकबाकी वसुलीसाठी महावितरणाचे कर्मचारी गेले. दरम्यान, उमेशने वीज बिल भरण्यास नकार दिल्याने महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईला सुरुवात केली. त्यावेळी उमेश चव्हाण याने कर्मचारी मंगेश गवई यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेमुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी थेट चान्नी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मंगेश गवई यांच्या फिर्यादीवरुन उमेश चव्हाण यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.