गोंदिया : जिल्ह्यातील भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल कार्यालयाचे 3 लाख रुपयांचे वीजेचे बिल थकित आहे. त्यामुळे बीएसएनएलचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यासंदर्भात बीएसएनएलतर्फे विद्युत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बीएसएनएलच्या वास्तविक परिस्थितीची जाणीव करून देत एमएसईबीकडे काही दिवसांची मुदत मागितली होती. परंतु एमएसईबीच्या अधिकऱ्यानी याप्रकरणी विभागातर्फे कोणतीही मदत केली जाऊ शकत नसल्याचे सांगितले.


यासंदर्भात बीएसएनएलच्या स्थानिक अधिकऱ्यानी आपल्या वरिष्ठांना विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठांनी सांगितले की राज्यभर बीएसएनएलची हीच परिस्थिती आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व कार्यालयांचे थकित पैसे भरले जातील.

दरम्यान वीज खंडित केल्यानंतर बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी जनरेटरवर कार्यालयाचे काम सुरु ठेवले. परंतु दोन दिवसांनंतर डिझेल संपल्यामुळे जनरेटर बंद पडले. त्यानंतर जनरेटरसाठी डिझेलकरिता निधी नसल्याने बीएसएनएलची सेवा संपूर्ण जिल्ह्यात पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.