मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. बऱ्याच गोंधळानंतर परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मार्च) केली. यामुळं आज एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते. 


काल नेमकं काय घडलं
राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटलं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने  पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. 


MPSC Exam | पुण्यातील एमपीएससी आंदोलन प्रकरणी गोपीचंद पडळकरांसह 9 जण अटकेत, 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल


काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
परीक्षा पुढे ढकलल्याच्या निर्णयानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सर्व स्तरांतून टीका होऊ लागल्यानंतर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. आज परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा काल (11 मार्च) केली. परीक्षेच्या तीन दिवसांआधी ती पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष होता. राज्यभरातील एमपीएससीचे  विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पवित्रा पाहता सरकारने ही परीक्षा येत्या आठवड्याभरात घेतली जाणार असल्याचं सांगितलं. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याशी फोनवरुन संवाद साधून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांचं आंदोलन संवेदनशीलरित्या हाताळावं अशी सूचनाही केली. 


आंदोलकांवर गुन्हे दाखल
पुण्यातील आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह 20 ते 25 आंदोलनकर्त्यांवर गैर कायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी अटकही केली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


MPSC Exam Postponed | एमपीएससी परीक्षेसंदर्भातील निर्णयाचा फेरविचार व्हावा; सर्वपक्षीय नेत्यांची मागणी


सरकारच्या निर्णयानुसार परीक्षा पुढे ढकलल्या : एमपीएससी
आयोगाचा निर्णय एकटा सचिव किंवा सहसचिव घेत नाहीत. शासनाने आम्हाला (MPSC) काल एक लेखी पत्र पाठवलं त्यावर आम्ही शासनाने पाठवलेल्या लेखी पत्राची अंमलबजावणी करत हे आजचं परिपत्रक काढलं आहे. हा निर्णय आपत्ती निवारण विभागाने दिला असून याला मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर हा निर्णय लेखी पत्राद्वारे घेण्यात आला असल्याचे आयोगाने सांगितले होते


मला अंधारात ठेऊन निर्णय : वडेट्टीवार 
आधीचे ट्वीट डिलीट केल्यानंतर वडेट्टीवार पुन्हा एकदा ट्विट डिलीट करत "माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.