मुंबई: बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी 22 ते 29 नोव्हेंबर या 8 दिवसात तब्बल 26 जणांशी गाठीभेटी घेतल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ईडीनं ही माहिती काल कोर्टासमोर सादर केली. भुजबळांना भेटणाऱ्यांच्या यादीत आमदार, खासदारांचाही समावशे आहे.


बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याच्या आरोपात भुजबळ सध्या अटकेत असून प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र याचा भुजबळ गैरवापर करत असल्याचं दिसून येतंय.

सूत्रांच्या मते, ज्या 26 जणांनी भुजबळांची भेट घेतली, त्यामध्ये शिवसेना आमदार अजय चौधरी, नाशिकमधील विश्वास को-ऑप बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर, पंकज भुजबळ आणि काही कुटुंबीयांचा समावेश आहे.

अटकेत असताना आरोपीला भेटण्यासाठी परवानगीची गरज असते, मात्र इथे भुजबळांना तब्बल 26 जण भेटून गेले. त्यामुळे याची चौकशी केली जाणार आहे.



भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का हलवलं?

कोणाच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, याचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील इडी कोर्टात ‘जेजे’चे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपलं लेखी उत्तर दिलं आहे.

दोन नोव्हेंबर रोजी जे जे हॉस्पिटलने छगन भुजबळांचा ताबा आर्थर रोड कारागृह अधिकाऱ्यांना दिला होता. त्यामुळे भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का दाखल केलं गेलं आणि कोणाच्या सांगण्यावरुन दाखल केलं गेलं याच्याशी जे जे हॉस्पिटलचा काहीही संबंध नसल्याचा दावा तात्याराव लहानेंनी केला आहे.

तसंच आपण कोर्टाचा कुठेही अवमान केला नाही, किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर केलेला नाही, असंही तात्याराव लहाने यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातमी

भुजबळांची रवानगी कोणाच्या सांगण्याने, डॉ. लहानेंचं उत्तर