सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंबंधीच्या आंदोलनाचं नेतृत्व करावं यासाठी पुण्यात मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी उदयनराजे यांची भेट घेतली. आज सकाळी पुण्यात काही मराठा संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी उदयनराजेंची भेट घेऊन आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारावं अशी विनंती केली आहे.
आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांशी बोलावं अशी विनंतीही यावेळी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी उदयनराजेंना केली. मराठा संघटनांच्या प्रतिनिधींच्या विनंतीनंतर उदयनराजेंनी आंदोलनाचं नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली आहे.
उदयनराजे आज मुख्यमंत्र्यांची भेटी घेण्यासाठी मुंबईत येणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी मराठा आरक्षणासंबधीच्या आंदोलनातील राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट उदयनराजे घेणार आहे. त्यानंतर उदयनराजे या प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका जाणून घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून आरक्षणाबाबत ठोस भूमिका मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचंही खासदार उदयनराजे यांनी स्पष्ट केलं आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी उद्या (शनिवारी) विधान भवनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. हा प्रश्न कोणत्या एका पक्षाचा नाही, त्यामुळे सर्वपक्षीय तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.