Udayanraje Bhosale : 'हिंमत असेल सगळ्यांची ईडी चौकशी करा, कोणत्याही चौकशीला मी घाबरत नसल्याचे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलं आहे. मी काय चिंदी चोर आहे का? मी पहिल्यापासून ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला त्याच्या विरोधात असल्याचे भोसले म्हणाले. फालतू आरोप करण्यापेक्षा त्यांनी ईडीच्या चौकशीच्या सामोरे जावं, मी सुद्धा ईडीच्या चौकशीला सामोरं जायला तयार असल्याचं खुलं आव्हान उदयनराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
मागील काही दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता खंडणीखोर असा आरोप केला होता. सातार्यातला एमआयडीसीची दुरावस्था असल्याचे सांगताना सातार्यातील खंडणी खोरांमुळे एमआयडीसी दुर्लक्षीत असल्याचं आणि कंपन्या येत नसल्याचा आरोप नाव न घेता उदयनराजेंवर केला होता. यावर उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर देताना असले फालतू आरोप करण्यापेक्षा त्यांनी ईडीच्या चौकशीच्या सामोरे जावं, मी ही ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचं खुलं आव्हान त्यांनी दिलं आहे.
उदयनराजे नेमकं काय म्हणाले ते पाहुयात...
1974 साली फक्त एमआयडीसी जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी होती. त्यावेळी मी लहान होतो. मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या वेळचे आमदार, खासदार त्यांनी का यात लक्ष घातले नाही. आत्ता माझ्यावर खापर फोडणं हे कितपत तथ्य आहे, असे उदयनराजे म्हणाले. सातारा आणि नगर एमआयडीसी एकाच वेळी सुरु झाली. नगरचा विस्तार किती झाला. सातारची का अशी अवस्था. त्याचे कारण त्यावेळचे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं. त्याला एकजण जबाबदार नाही, तर त्यावेळचे सर्व आमदार, खासदार जबाबदार असल्याचे उदयनराजे म्हणाले. सर्वांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे असेही ते म्हणाले.
एमएससीबीच्या कनेक्टीविटीमुळं आणि त्याच्या विस्तारामुळं ठिक ठिकाणी तुम्ही आडमार्गाला फॅक्टरी सुरु करता. तशी त्यावेळची परिस्थिती नव्हती. त्यावेळी जर तसे केले असते तर एमआयडीसीची वेगळी ओळख झाली असती. विस्तार का झाला नाही, त्या कंपन्यांना त्यावेळी संरक्षण दिलं नाही. संरक्षण म्हणजे त्यांना सिक्युरीटी असे म्हणत नाही तर दिलासा तरी दिला पाहिजे असे भोसले म्हणाले.
आम्ही जनतेचे सेवक लुटारु नाही
कोणाच्यात दम असेल तर समोर येऊन सांगावं, मी काय चिंदी चोर आहे का? असेही भोसले म्हणाले. मी तर पहिल्यापासून ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला, उधळपट्टी झाली त्या त्या ठिकाणी उघडपने बोललो आहे. भ्रष्टाचाराच्या बाबत मी पहिल्यापासून विरोधात आहे. लोकांचे कल्याण झालं पाहिजेत या मताचा मी आहे. खंडनीच कोणी काय म्हटलं मला माहिती नाही. त्यांचा वैयक्तिक काय स्वार्थ असेल तर मला माहिती नाही असेही ते म्हणाले. माझ्यावर दोन लाखाच्या खंडनीचा आरोप करता. माझी प्रॉपर्टीच एवढी आहे, की माझ्या गाडीचं टायरच त्याच्यापेक्षा जास्त किंमतीचं आहे. नाकातली घान काढून जगणाऱ्यातले आम्ही नाही. वेळप्रसंगी एखाद्या वेळेस लोकांना सांगेन मी माझ्याकडे अन्न नाही किंवा भिक्षूक असतो तसे पत्करेन. पण ती वेळ कधी येणार नाही असेही उदयनराजे म्हणाले. आम्ही जनतेचे सेवक आहोत लुटारु नाही असेही ते म्हणाले.