Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या ऑपरेशन परिवर्तन उपक्रमास भेट दिली. यावेळी सुळे यांनी बंजारा समाजाच्या महिला शिवणकाम, विणकाम, नक्षीकाम करतात याची पाहणी करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली. दरम्यान या महिलांच्या कामाचं कौतुक करताना सुप्रिया सुळेंनी 'मेड इन इंडिया' वस्तू वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सुट्टीला दुबईला न जाता वेरुळ अजिंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला असेही त्या म्हणाल्या.
सोलापुरातल्या मुळेगाव तांड्यामध्ये सुरु केलेल्या 'ऑपरेशन परिवर्तन' उपक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन महिलांना सुप्रिया सुळे यांनी प्रोत्साहन दिले. मुळेगाव तांडा येथील अनेक जणांचे व्यवसाय हे दारु निर्मिती आणि विक्री होते. मात्र, त्यांचे समुपदेशन करुन पोलीस अधिक्षक सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन राबविला. या माध्यमातून त्यांनी विविध संस्थांना सोबत घेऊन अवैध व्यवसाय सोडलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. याच उपक्रमाची पाहणी आज खासदार सुळे यांनी केली. यावेळी सुळेंनी 'मेड इन इंडीया' वस्तू वापरण्याचा सल्ला दिला. सुट्टीला दुबईला न जाता वेरुळ आणि अजिंठाला जा मात्र कपडे सोलापूरचे घाला. मी स्वतः फॉरेनचे कोणतेच कपडे वापरत नाही. मी जे वापरते ते सर्व मेड इन इंडिया आहे असे सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सोलापुरात राबविलेला उपक्रम ऑपरेशन परिवर्तन हा दिशादर्शक आहे. या उपक्रमाची माहिती गृहमंत्री तसेच वस्त्रद्योग मंत्रालयाला देणार असून, या महिलांच्या उद्योगाला चालना मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असायल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सुरुवातीला सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांना अभिषेक करुन दर्शन घेतले.
देशात आणि महाराष्ट्रातच जिथे जिथे चांगली कामे होतात त्याची आपण नोंद घेतली पाहिजे. सातत्याने त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आज जे पाहिले ते अप्रतिम होते. या महिलांचे खूप सुंदर काम असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे. मला कधीही एकटीला जाताना भिती वाटत नाही. महाराष्ट्राचे पोलीस हे जबाबदार पोलीस आहेत. त्यांच्याबद्दल मला विश्वास, आदर आणि वर्दीवर प्रेम असल्याचेही सुळे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
- INS Vikrant निधी अपहार प्रकरण: नील सोमय्यांनाही दिलासा, हायकोर्टाने पोलिसांना दिले 'हे' निर्देश
- दंगलीच्या घटनेमुळे मुख्यमंत्री, पालकमंत्री अपयशी ठरले; आमदार रवी राणांचा आरोप