सोलापुरात आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी गेले आठ दिवस जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख उपोषणाला बसले आहेत. आठ दिवसांपासून अन्न सेवन न केल्याने देशमुख यांची प्रकृती खालावली. देशमुखांना उपचारासाठी सोलापूरला हलवण्याचा सल्ला स्थानिक डॉक्टरांनी दिला.
एबीपी माझाने प्रभाकर देशमुखांची उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याची बातमी दाखवली. त्यानंतर भाजपचे सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांना जाग आली आणि त्यांनी थेट आंदोलनस्थळ गाठलं.
खासदार शरद बनसोडे हे केवळ आंदोलनाच्या ठिकाणी गेले नाहीत, तर ते प्रभाकर देशमुख उपोषण करत असलेल्या कालव्यात कार्यकर्त्यांचा आधार घेत उतरले. इथेही केवळ उतरलेच नाहीत, तर प्रभाकर देशमुखांसमोर हात जोडले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
कालव्यात उतरणे, हात जोडून विनंती करणे, हे तर काहीच नाही. याही पुढे जात सत्ताधारी पक्षाचे खासदार असलेल्या शरद बनसोडे यांनी सरकारलाच धारेवर धरलं. खासदार बनसोडे म्हणाले, “सरकारं कोणतीही असोत, ती गेंड्याच्या कातडीचीच असतात. त्यांना हलवण्यासाठी अशी आंदोलनं अनिवार्य असतात. मलाही या विषयावर बोलण्यासाठी पाया पडत फिरावं लागणार आहे. फक्त सरकार आमचं असल्याने थोडं सोपं होईल, हाच तेवढा फरक आहे.”
शरद बनसोडे यांच्या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षाचा खासदारच हतबल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आंदोलकांच्या भेटीसाठी कालव्यात उतरलेल्या खासदार शरद बनसोडे आंदोलनाचा मूळ विषय तडीस नेतील का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.