कोल्हापूर : मराठा समाजाची भूमिका आणि समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण राज्यातील काही भागांचा दौरा करणार आहोत, असं खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे. तसेच मराठा आरक्षण प्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाईल, असंही ते म्हणाले. 27 मे रोजी खासदार संभाजीराजे मुंबईत असणार आहेत. त्यादिवशी सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. कोरोना संकटात जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मराठा समाजानं संयम बाळगावा असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. 


खासदार संभाजीराजे बोलताना म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला, जो गायकवाड कमिशनच्या माध्यमातून आरक्षणाचा अहवाल देण्यात आला होता. तो पूर्णपणे धुडकावून लावलेला आहे. त्यामुळे यापुढे समाजानं आपली भूमिका कशी मांडायची, मार्ग काय काढायचा या दृष्टीकोनातून मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी मी इथे आलो. मला अत्यंत आनंद झाला. मी गहिवरुन गेलो, भारावून गेलो. ही शाहू महाराजांची नगरी, शाहू महाराजांनी जी दिशा राज्याला आणि देशाला दिली. ती पुरोगामी चळवळीची आहे. आणि संपूर्ण पुरोगामी चळवळच ही आहे की, संपूर्ण बहुजन समाजाला कसं एकत्र आणता येईल, या समाजाला न्याय कसा देता येईल. म्हणून 1902 ला बहुजन समाजाला 50 टक्के आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आज मराठा समाजावर अन्याय झालाय. आताही माझ्या आजूबाजूला जी लोकं आहेत. ती समाजातील बारा बलुतेदारांनी समाजाला एकत्र येऊन पाठिंबा दिलाय. शाहू महाराजांचा विचार कोल्हापुरातील सर्व बहुजन समाजातील लोकांनी जपलाय आणि यापुढेही जोमानं हा विचार जपू, असा संदेश या लोकांनी आज दिलाय. यामुळे मी आज सर्वांचे आभार मानतो."


"आज मी मराठवाडा, खान्देश आणि 27 तारखेपासून मुंबईत येणार आहे. मराठा आरक्षणाविषयी अनेक कायदेतज्ज्ञांनी, अभ्यासकांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माझाही थोडा अभ्यास झाला आहे. पण या गोष्टी मांडत असताना आंदोलन करणं हा एक भाग आहे. पण आंदोलनाच्या बरोबरीने आपल्यालासुद्धा मार्ग काय काढता येईल, आपण राज्य सरकारला, केंद्र सरकारला काय सूचना देऊ शकतो. हे समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. आणि ज्या गोष्टी आपल्या हातात आहे, अशा गोष्टी समाजाकडून समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे.", असं खासदार संभाजीराजे छत्रपती बोलताना म्हणाले. आज छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केलं, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ऊर्जा घेऊन कोल्हापुरातून या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करत असल्याचंही खासदार संभाजीराजेंनी सांगितलं. 


27 मे रोजी किंवा 28 तारखेला मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेते या सर्वांच्या भेटी मुंबईत घेतल्यानंतर नेमकी मराठा समाजाची काही भूमिका आहे, हे सविस्तर पद्धतीनं आपण मांडू, असंही संभाजीराजे यांनी सांगितलं. 


संभाजीराजे यांनी बोलताना मराठा समाजाला पुन्हा एकदा आवाहन केलं आहे. संभाजीराजे बोलताना म्हणाले की, "मी मान्य करतो मराठा समाज अस्वस्थ आहे. पण सध्या कोरोनाची महामारी असल्यामुळं आपला जीव महत्त्वाचा आहे. त्याकडे सर्वांनी सर्वात आधी लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर आपण समाज जे ठरवेल ती भूमिका आपण मांडू." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आंदोलन हा एक भाग असतो की, आपलं मत आहे, ते सरकारपुढं मांडायचं. माझं असं मत आहे की, समाजाला काढलेल्या मोर्चांची अख्ख्या जगानं दखल घेतली आहे. कित्येकदा लोकांना रस्त्यावर आणायचं. सर्व राजकीय पक्ष आहेत, आमचा कोणत्याही पक्षावर द्वेष नाही. याप्रकरणी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे."