औरंगाबाद :  माझी कुणासोबत तुलना करू नका, माझा लढा स्वतंत्र आहे. मी कुणालाही माझ्या सोबत येण्याचे आवाहन करणार नाही. समाजाला वेठीस कुणीही धरू नये, आधी 58 मोर्चे काढले आहेत, आता जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपतींनी आज  कायगाव टोका इथे काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझा लढा 2007 पासून आहे, मी शाहू महाराजांचा वंशज आहे. मी राजकारण करत नाही. राजकारण बाजूला टाकून समाजाला न्याय देण्याची माझी भूमिका आहे. माझे सगळ्यांना आव्हान आहे की, कोण राजकारण करतंय ते सांगावं, असं ते म्हणाले. 


ते म्हणाले की, काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे. ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं. त्या सगळ्यांना अभिवादन. सकाळी कोपर्डीला गेलो होतो. सरकारला माझी विनंती आहे ज्यांनी समाजासाठी बलिदान दिले, त्यांच्या घरातील सदस्यांना सरकारने शब्द दिला होता नोकरी देऊ. मात्र आजपर्यंत नोकरी दिली नाहीये, ही प्रक्रिया युद्धपातळीवर करायला हवी. कुठलीही नोकरी देऊ नका, फालतू खात्यात देऊ नका, बलिदान ज्यांनी दिलं त्यांना न्याय द्या, घरातील एकाला नोकरी द्या, आणि चांगल्या खात्यात नोकरी द्या, असं ते म्हणाले.  


मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सुद्धा मागे घ्यावे अशी माझी विनंती आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.  मराठा आरक्षणाबाबत आता उपाय म्हणजे, रिव्हिव पीटीशन करायला हवी, क्युरेटिव्ह पीटीशन करायला हवी आणि शेवटचा पर्याय 338 ब च्या माध्यमातून आयोग स्थापन करून राष्ट्रपती केंद्रीय मागास आयोगाला सूचना करतील, आता यावर लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला हवे, असं ते म्हणाले. 


सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसींना मिळणाऱ्या सवलती द्याव्या, प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह, निवड झालेल्या मुलांना सुपर नुमररी पद्धतीने पोस्टिंग द्यावी अशा आमच्या  5 मागण्या आहेत, असं संभाजीराजे म्हणाले. 


संभाजीराजे म्हणाले की, आता मोर्चा काढून  मी तरी समाजाला वेठीस धरणार नाही. आता 36 जिल्ह्यात मूक आंदोलन करणार आहे. सरकारने दुर्लक्ष केल्यास विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. 16 मार्चपासून आंदोलन सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.