माझा बिझनेस किंवा इकॉनॉमी क्लासबद्दलचा आग्रह नव्हता, तर एअर इंडियाद्वारे मिळणाऱ्या गलिच्छ सेवेबद्दलचा होता. तसंच माध्यमांतून एकच बाजू दाखवली जात असून, एअर इंडियाकडून दिशाभूल करण्यात येत आहे, असं खासदार रवींद्र गायकवाड यांनी म्हटलं आहे.
रवींद्र गायकवाड यांनी काय म्हटलंय?
पुणे ते दिल्ली या एअर इंडियाच्या विमानाचे बिझनेस क्लासचे तिकीट होतं एअर इंडियाकडून मला बिझनेस क्लासचा बोर्डिंग पासही दिला. मात्र मी विमानात जाईपर्यंत या विमानात बिझनेस क्लास नाहीच हे मला कोणीही सांगितलं नव्हतं.
मी असंख्यवेळा इकॉनॉमी क्लासनेच प्रवास केला आहे. त्यामुळे मला क्लासची कोणतीही अडचण नव्हती.
दरम्यान, मागील बाजूस अडचणीच्या आणि गैरसोयीच्या सीटवर एक अपंग व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीला माझी पहिल्या रांगेतील सीट दिली. मात्र माझं हे कृत्य बिझनेस क्लाससाठी असल्याचं खोटं वृत्त पसरवण्यात आलं.
प्रवाशांना तिकीटं दिली जातात, पण तशा सुविधा दिल्या जात नाहीत. त्याचीच तक्रार करण्यासाठी मी पुस्तिकेची मागणी केली. पण मला दिल्लीत पोहचेपर्यंत ती दिलीच नाही.
मी वरिष्ठांशी भेट घालून देण्याची विनंती केली, तोपर्यंत विमानात बसून राहिलो. त्यादरम्यान सुकूमार नावाचा एक अधिकारी प्रचंड संतापाने गोंधळ घालत आला.
कौन हे MP, कौन हे MP मै नही जानता, असं मोठ्याने ओरडत आला. त्यावेळी मी त्यांना तुम्ही वयस्कर आहात, शांत राहा, BP वाढवून घेऊ नका, असं सांगितलं.
त्यावर त्यांनी, ऐसे MP 25 सालसे देख रहा हूँ, मै आपकी मोदीसे कंप्लेन्ट करुंगा, अशी अरेरावीची भाषा करताना हुज्जत घातली. इतर कर्मचारी त्याला शांत राहण्यास सांगत होते, मात्र तो माझ्या अंगावर धावून आला. मला बाहेर ओढू लागला.
त्यावेळी अन्य कर्मचारी तो पागल आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका असं म्हणत होते.
सुकूमार नावाच्या व्यक्तीने माझा व माझ्या पदाचा अवमान केला, तसंच पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला.
दरम्यान, माध्यमातून याप्रकाराचं एकेरी वार्तांकन झालं आहे. माध्यमांनी या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ प्रसिद्ध करावा.
एअर इंडियाकडून मिळणाऱ्या असुविधांची तक्रार मी लोकसभा अध्यक्ष, नागरी उड्डाण मंत्री यांच्याकडे केली आहे.
मला तिकीटबंदी करुन माझ्या संचार स्वातंत्र्यावर घाला आणला आहे, तसंच कोणत्या कायद्यानुसार माझं तिकीट रद्द केलं, हेही सांगावं.
एअर इंडियाकडून दिल्या जाणाऱ्या असुविधा, उशिरा मिळणारे एअरपोर्ट बॅगेज, विमानातून हरवणारे सामान, अंतर्गत अस्वच्छता, विमानाच्या वेळेतील उशीर, स्वच्छतागृह, बिझनेस क्लास तिकीट असताना इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला भाग पाडणं, जेवणाचा दर्जा इत्याही असुविधांबाबत मी आवाज उठवून सेवांमधील सुधारणेसाठी प्रयत्न करणार आहे, असं रवींद्र गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
प्रत्यक्षदर्शी एअर होस्टेस खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बाजूने
मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून खा. गायकवाड यांना समज