अकोला : शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना शेतकऱ्यांनी कपडे काढून मारलं पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. अकोला जिल्ह्यातील निंबा गावात आयोजित जाहीर सभेत राजू शेट्टी बोलत होते.


राज्यभरातील गावागावात जाऊन भाषणं ठोकणाऱ्या, मिरवणाऱ्या आणि खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना ठोकलं पाहिजे. खोटी आश्वासनं देणाऱ्या मंत्र्यांना नुसतं ठोकलं नाही पाहिजे, तर कपडे फाडून तुडवलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मतं असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं.


अकोल्यात दोन-तीन मंत्र्यांना कपडे काढून मारा. पोलीसही तुम्हाला काही करणार नाहीत. तेही या सरकारला त्रासले आहेत, असं राजू शेट्टी जाहीर सभेत म्हणाले.


रविकांत तुपकर यांचंही वादग्रस्त वक्तव्य
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं. राजू शेट्टींनी सांगितलं तर मंत्र्यांना भोसकायलाही कमी करणार नसल्याचं तुपकर म्हणाले.


यापुढे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करायची नाही. गरज पडल्यास कापूस-सोयाबीनला भाव न देणाऱ्या एखाद्या मंत्र्यांना पेटवा, आमदाराला, खासदाराला ठोका पण आत्महत्या करू नका असं टोकाचं वक्तव्य तुपकर यांनी केलं. तसेच कापूस सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी येत्या 19 तारखेनंतर आंदोलनाचा इशाराही तुपकर यांनी यावेळी दिला.