लातूर : सांगलीतील पोलिसांच्या गुंडगिरीचे प्रकरण ताजे असताना, लातुरातही पोलिसांची अरेरावी पाहायला मिळाली. धार्मिक वाद असलेल्या ठिकाणी गेलेल्या भाजप नगरसेवकाला आरोपीसारखे गाडीत घालून पोलीस ठाण्यात नेले आणि मारहाण केली.
अजय कोकाटे हे लातूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रभागात एका ठिकाणी दोन गटात धार्मिक जागेवरुन वाद होता. वाद वाढल्याचं कळल्यावर कोकाटे त्या ठिकाणी गेले.
अजय कोकाटे यांनी दोन्ही गटामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पीएसआय शिवदास लहाने तिथे आले आणि म्हणाले, “तू कोण मध्ये पडणारा? तुझे येथे काय काम? प्रभागाचे कामं सोडून काय करतोस?”
धक्कादायक म्हणजे, पोलिसांनी कोकाटेंनी गाडीत जबरदस्तीने बसवले आणि पोलीस ठाण्यात नेलं. या वादाला कारणीभूत तुम्ही लोकच आहेत, असे सांगत बेल्टने मारहाण केली.
अजय कोकाटे हे लातूरचे माजी नगराध्यक्ष मधुकर कोकाटे यांचे सूपुत्र आहेत. मधुकर कोकाटे हेही पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांच्याशीही पोलीस अरेरावीच्या भाषेत बोलले.
त्यानंतर अजय कोकाटे यांचे मित्र आणि सहकारी नगरसेवक त्या ठिकाणी पोहचले. पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्यासमोर प्रकरण गेले. दोन्ही बाजूंच्या तक्रारी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पीआय नानासाहेब उबाळे आणि पीएसआय शिवदास लहाने तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच त्यांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
याबाबत लातूरचे पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न केला असता ते बाहेरगावी असल्याचे कळले. मात्र या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. मात्र यावर भाजपाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. ते या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करत आहेत. तसेच सीसीटीव्हीतील दृश्य पाहून न्याय द्या, अशी मागणी करण्यात येत आहे.
भाजप नगरसेवकाला पोलिस ठाण्यात नेऊन पट्ट्याने मारहाण
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
15 Nov 2017 08:49 PM (IST)
अजय कोकाटे हे लातूरचे माजी नगराध्यक्ष मधुकर कोकाटे यांचे सूपुत्र आहेत. मधुकर कोकाटे हेही पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांच्याशीही पोलीस अरेरावीच्या भाषेत बोलले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -