इस्लामपूर (सांगली) : गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामधील वाद समोर आला होता. दोघांमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा होती. मात्र, हे दोन्ही नेते सांगलीतील कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र आले होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत रयत विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या सत्कारासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत एकाच व्यासपीठावर आले.
“स्वाभिमानी शेतकरी संघटना ही वाघाची संघटना आहे. एकमेकांना चावा घेण्याचा प्रयत्न करणारच. आम्ही एका व्यासपीठावर आलो, याने ज्या लोकांना काय समजायचे ते नीट समजले असेल.”, असे म्हणत सदाभाऊंसोबतच्या वादाच्या चर्चांवर खासदार राजू शेट्टींनी भाष्य केले.
“स्वाभिमानीची दोन्ही चाके एकाच दिशेने चालत आहेत. फक्त एक चाक सतेत आणि एक चाक शेतकऱ्यांसोबत आहे. पण संघटना आणि विकासाची ही दोन चाकं भविष्यात देखील सोबतच दिसतील.”, असेही खासदार राजू शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टी पुढे म्हणाले, “संघटनेत प्रत्येकाला विचार करण्याची मुभा आहे. मात्र, चळवळ टिकली पाहिजे यासाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील आहोत. पूर्वी सदाभाऊ शेतकरी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत होते. सरकारमध्ये असल्याने त्यांना मर्यादा आहेत. म्हणून मी आक्रमक झालो आहे.”
“राजू शेट्टींसोबत माझा वाद नाही. आजपर्यत कुणाशी वाद न घालता मी इथपर्यत पोहचलो आहे. मग कशाला कुणाशी वाद घालू? जे नशिबात असेल ते मिळेल.”, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे दोघेही एकाच व्यासपीठावर येत, दोघांमधील वादाच्या चर्चांवर एकप्रकारे पडदा टाकण्याचाच प्रयत्न केला आहे.