सातारा :  कोणाचेही आरक्षण काढून घेऊ नका, पण मराठा समाजावर (Maratha Reservation) अन्याय करू नका. सामान्य लोकांना पक्षीय राजकारणाशी काही देणे घेणे नाही उद्रेक झाला तर याला राजकारणी कारणीभूत असतील, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle)यांच्या निवासस्थानी जलमंदिर पॅलेस येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. यांनतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य शासनाला चांगलेच धारेवर धरले. 


ते म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या राज्य सरकारच्या कोलांट्या उड्या बघून मी माझी पुढची भूमिका ठरवणार आहे. राज्य सरकारने भूमिका मांडल्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करेन असं सांगून राज्य सरकारने श्वेत पत्रिका जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.  


त्यांनी म्हटलं की,  गायकवाड समितीच्या अहवालाचे योग्य पद्धतीने वाचन झाले नाही.  कोरोनामुळे लोक शांत आहेत. मराठा आरक्षणावर मी भूमिका मांडायला वेळ लागला नाही, असंही ते म्हणाले. 


उदयनराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण केले जाते आहे. मात्र त्यांचे आचार अमलात आणले जात नाहीत. सध्या सुरू असलेल्या गोष्टींमुळे मन दुःखी झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हे अभिप्रेत नाही. लोकांना हात जोडून विनंती करतो कोणत्याही विचाराला बळी पडू नका, असं उदयनराजे म्हणाले. 


Maratha Reservation : मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, 16 जूनपासून आंदोलनाला सुरुवात; संभाजीराजेंचा इशारा


रायगडावरुन बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, राजसदरेवरुन बोलतोय, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं पण आता गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 16 जून पासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले. रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली. 


दिशा दाखवणं हे आमचं काम आहे, कोणाहाली दिशाहीन करणे हे आमच्या रक्तात नाही असं सांगत संभाजीराजे म्हणाले की, "रायगडावरुन आतापर्यंत नेहमी सामान्यांचे विषय मांडले, कोणताही राजकारणाचा मुद्दा मांडला नाही. ज्या शिवाजी महाराजांनी बहुजनांसाठी स्वराज्य निर्माण केलं, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं त्यांच्याच राज्यात आज मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी झगडावं लागतंय हे दुर्दैव आहे."