कोल्हापूर : कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली.

60 वर्षीय बंडू बाळकू पाटील  हे आपल्या वैयक्तिक कामासाठी 65 हजार रुपये घेऊन गावाकडे चालले होते. यावेळी रंकाळा बस स्थानकात एसटीमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील पैसे चोरून नेले. एसटीमध्ये बसल्यावर आपले 65 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना त्यांच्या लक्षात आली.

बंडू पाटील हे याबाबतची तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांना तक्रार देताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि पोलीस ठाण्यातच त्यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.