सातारा : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मनधरणी करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांची आज भेट घेतली. मात्र अमोल कोल्हेंची शिष्टाई निष्फळ ठरल्याचं दिसून येत आहे.
उदयनराजे आणि अमोल कोल्हे यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदयराजेंचं मन वळवण्यात यश आलं का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना अमोल कोल्हेंनी म्हटलं की, मावळा राजेंचं मन वळवू शकत नाही.
उदयनराजे यांनी आपल्यासोबत रहावं ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र जी व्यक्तीमत्व स्वयंभू असतात ते आपले निर्णय स्वत: घेतात. यावेळी अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
अमोल कोल्हे माझे जुने मित्र आहेत. त्यामुळे आमच्या भेटीला राजकीय रंग देऊ नये. उदयनराजेंनी राष्ट्रवादीमध्ये राहावं की भाजपमध्ये जावं? या अमोल कोल्हे यांना विचारलेल्या प्रश्नाला उदयनराजेंनी उत्तर दिलं. "मी पृथ्वीवर राहावं असं त्यांना वाटतं, असं गमतीशीर उत्तर त्यांनी दिलं.
काल सोलापुरातील भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात उदयनराजे भाजप प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र त्यांचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं समोर येत आहे. माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना मी याबाबत विचार करुन निर्णय घ्या, असं सांगितल्याची माहिती उदयनराजेंनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना दिली आहे.
मेगा भरतीला मी भीक घालत नाही
'काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना त्यांनी माझं एकही काम केलं नाही. मी सांगून कंटाळलो पण काम झालं नाही', असा आरोपही यावेळी उदयनराजेंनी केला आहे. "आम्ही लोकांकरिता लढलो, रस्तारोको केला, आमच्यावर केसेस झाल्या. काही कारण नसताना माझ्यावर खंडणीची केस दाखल झाली. 302,307 सारखे गुन्हे दाखल झाले. खोट्यानाट्या केसेस झाल्या", असं उदयनराजे म्हणाले. तसेच 'राजकारण सुरु असतं. सत्ता इकडची तिकडं जाते, मंत्री बदलतात. मी सत्तेचा कधी अट्टहास केला नाही. मेगाभरतीला मी भीक घालत नाही, आम्हाला गरज पण नाही', असंही त्यांनी म्हटलं आहे.
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशात चंद्रकांतदादांचा खोडा?