मुंबई : गैरमार्गाने मिळवलेली अभियांत्रिकीची पदवी काढून घ्या, अशी मागणी करत जळगावच्या तरुणाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (बीई)ची डिग्री गैरमार्गाने मिळवल्यामुळे मनात अपराधी भावना निर्माण झाल्याचं त्याने सांगितलं.


विशेष म्हणजे पदवी काढून घेण्याची मागणी करणारी तरुणाची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
'वाईट काळ विसरुन जा, आयुष्यात पुढे जा' असा सल्लाही कोर्टाने तरुणाला दिला.

जळगावात राहणाऱ्या 26 वर्षीय वैभव पाटीलने गेल्या वर्षीही हायकोर्टात धाव घेतली होती. गैरमार्गाने मिळवलेली पदवी रद्द करण्याबाबत कोणताही कायदा नसल्याने कोर्टाने ऑक्टोबर महिन्यात त्याची याचिका फेटाळली होती.

त्यानंतर वैभवने मुंबई विद्यापीठाकडे आपली बीईची डिग्री रद्द करण्याची मागणी केली. युनिव्हर्सिटीनेही असमर्थता दर्शवल्याने तरुणाने पुनर्विचार याचिका दाखल केली. ही याचिका त्याच खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली.

'आम्हाला तुमच्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे. या सगळ्या गोष्टी विसरुन जायचा प्रयत्न करा आणि आयुष्यात पुढे जा. तुम्ही खूप वर्षांपूर्वी एक चूक केली होती आणि ती तशीच ठेवलीत. आता कोणता त्रास तुम्हाला होत आहे?' असा संवाल खंडपीठाने वैभवला विचारला.

'माझ्या मनात अपराधी भावना निर्माण झाली आहे. मी तेव्हापासून नोकरीही धरलेली नाही. 2012 मध्ये मी विद्यापीठाकडे डिग्री परत घेण्याची मागणी केली होती, मात्र त्यांनी तसं केलं नाही. मी सायक्रॅटिस्टकडे गेलो आणि त्यांनी उपचार केले. मात्र डिग्री परत न करण्यास सांगितलं.' असं वैभवने स्पष्ट केलं.

'आमचे हात कायद्याने बांधले गेले आहेत. मात्र सुप्रीम कोर्टात तुम्ही जाऊ शकता' असं उत्तर कोर्टाने दिलं.

वैभव पाटीलने 2011 मध्ये माहिती तंत्रज्ञान या विषयातून बीईची डिग्री घेतली. पहिल्या वर्षी तो मॅथ्स 2 हा पेपर अनुत्तीर्ण झाला होता. मित्राच्या सल्ल्याने त्याने दलालाला 20 हजार रुपये देऊन स्वतःला पास करुन घेतलं, अशी माहिती त्याने दिली आहे.