>> अमित भिडे, ABP माझा प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन आणि मुजरा करूनच या लेखाची सुरूवात करतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा या सिनेमानंतर पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी सुरू झालीय. आता सध्याच्या स्थितीला इतिहासाची उजळणी म्हणायचं की भावनांचा कल्लोळ हा प्रश्नच आहे. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकात आम्हाला संभाजी महाराज का नीटसे शिकवले गेले नाहीत पासून महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर का राहू द्यावी इथवर हे प्रश्न विचारले गेले. आता या सगळ्या प्रश्नांनंतर लोकांनी काय कृती केली तर एकमेकांविरोधात दोन समाज पुन्हा एकदा उभे राहिले. ते विरूद्ध आपण अशी दरी पुन्हा प्रकर्षाने जाणवू लागलीय. त्यातूनच घडले नागपूर हिंसाचारासारखे प्रकार... मुळात छावा चित्रपट निर्मात्यांना तरी हा परिणाम अपेक्षित होता का हा प्रश्नच आहे. पण सिनेमातून काय घ्यायचं, काय घेऊ नये, त्यावर कसं रिअॅक्ट करायचं हे जो तो आपापल्या वकुबाप्रमाणे ठरवतो. छावा सिनेमा पाहिल्यावर मला त्यावर अजिबात लिहावंसं वाटलं नाही.
संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं अतिशय गूढ व्यक्तिमत्व... प्रचंड हुशार, अद्वितीय शूर, कणखर... साक्षात शिवछत्रपतींचा मुलगा, जिजाऊ आईसाहेब आणि शहाजी महाराजांचा नातू. संभाजी महाराजांची तलवारीची ताकद आपल्याला इतिहासात नक्की शिकवलीय. ती ज्यांना आठवत नाही, त्यांनी एकतर इतिहासाच्या तासाला झोपा काढल्या किंवा ते मुलखाचे विसराळू असतील. पण संभाजी महाराजांची एक महत्त्वाची गोष्ट खरोखर आपल्याला शिकवली नाही ती म्हणजे त्यांची शस्त्राइतकीच शास्त्रावरती हुकुमत... वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी महाराष्ट्राच्या द्वितीय छत्रपतींनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. त्याशिवाय नखशिख, नायिकाभेद हे ग्रंथही त्यांनी लिहिले. खरंतर शालेय इतिहासात या ग्रंथांची नावंही आपल्याला शिकवली आहेत. पण त्या ग्रंथात नेमकं काय लिहिलंय हे मात्र शिकवायला शालेय अभ्यासक्रम कमी पडला. सिनेमा पाहिल्यावर मी या अद्वितीय महाराजांनी केलेलं लेखन वाचण्याचा निर्धार केला. बुधभूषण या ग्रंथाची प्रत मला माझ्या पत्नी वैशाली भिडे यांनी उपलब्ध करून दिली. डोंबिवलीच्या पवार पब्लिक स्कूलमध्ये ही प्रत सापडली. डॉ. प्रभाकर ताकवले यांनी या संस्कृत ग्रंथाचं मराठीत भाषांतर केलंय. अॅडव्होकेट शैलजा मोळक यांनी याचं संपादन केलं तर प्रकाशक आहेत जिजाई प्रकाशनचे किशोर कडू.
शंभूराजांनी एकूण 883 संस्कृत श्लोक या ग्रंथात लिहिले. भांडारकर संस्थेनं त्याचं वर्गीकरण करताना तीन अध्याय केले. त्यापैकी पहिल्या अध्यायात 194 श्लोक, दुसऱ्या अध्यायात 630 श्लोक, तर तिसऱ्या अध्यायात 59 श्लोक आहेत. या ग्रंथात शंभूराजांनी राजनीती, राजाची कर्तव्ये, राजाची लक्षणे, अमात्य म्हणजे मुख्य प्रधान, राजपुत्राची लक्षणं, कर्तव्य, त्याचं शिक्षण कसं व्हावं, राजाचे सहाय्यक कसे असावे, कोशनिरूपण , राष्ट्र, दुर्ग कसे असावे, दुर्गाचे प्रकार कोणते, राजाची सेना कशी असावी, गुप्तहेर, त्यांची कर्तव्ये, राजाचे आचरण इत्यादी गोष्टींची मिमांसा केलीय. बुध म्हणजे शहाणा आणि भूषण म्हणजे दागिना असा या ग्रंथाच्या नावाचा अर्थ आहे.
पहिल्या अध्यायात गणरायाला वंदन करून ग्रंथाची शंभूराजांनी सुरूवात केलीय. शंभू महाराज म्हणतात...
देवदानवकृत स्तुतिभागं हेलया विजित दर्पितनागम्भक्तविघ्नहनने धृतरत्नं, तं नमामि भवबालकरत्नम्
याचा अर्थ असा की गर्वोन्नत हत्तींना सहजरितीने जिंकून देवदानवांच्या स्तुतीस पात्र ठरलेले, भक्तांच्या विघ्नांचे हनन करणाऱ्या व रत्न धारण करणाऱ्या रूप श्रीशिवशंकराच्या बालकरत्नास मी नमस्कार करतो. त्याच अध्यायात शिवशंकराला वंदन करताना शंभूराजे म्हणतातशशांगमौलिं भसितेन भासुरं पंचाननं शैलसुताधिनाथम्त्र्यक्षं गिरीशं दशबाहुमण्डितं कुबेरमित्रं सततं नमामि
याचा अर्थ भालप्रदेशीच्या मुकुटावर चंद्र विराजमान झालेला, भस्माने शरीर चकाकत असणारा, सिंहस्वरुपी शैलकन्येचा प्राणप्रिय पति, त्रिनेत्रधारी, हिमालयाचा स्वामी, दशभुजांनी शोभणारा, कुबेराचा मित्र असणाऱ्या त्या देवतेस श्री शिवशंकरास मी नेहमीच नमन करीत असतो...
छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा खु्द्द शहाजीराजांनी लिहिली असं सांगितलं जातं. स्वकुलाचं वर्णन करताना आपले आजोबा शहाजीराजांबाबत शंभूराजे काय सुंदर लिहितात पाहा...
भृशबदान्वयसिन्धु सुधाकर प्रथितकीर्तिरूदारपराक्रमःअभवतर्थकलासु विशारदोजगति शाहनृपः क्षितिवासवः
विविध सामर्थ्याचा प्रचंड समन्वय झालेला पृथ्वीतलावर वसुरुप किंवा शिवच असणारा शाह (शाहाजी) नावाचा कीर्तिसंपन्न उदार व श्रेष्ठ, पराक्रमाची शर्थ करणारा तसेच अर्थकारण व विविध कलांमध्ये पारंगत असणारा, विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर गुणसागरावरील चंद्राप्रमाणे शोभत होता. असे सिंधु सुधाकरासारखे बलशाली, कीर्तिमान, उदार, पराक्रमी अर्थकलांमध्ये प्रवीण राजे शहाजी होऊन गेले.
खुद्द शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन संभाजीराजे कसं करतात पाहा...
कलिकाल भुजंगमावलीढं निखिलंधर्ममवेक्ष्य विक्लवं यःजगतः परिरंशतोवतापोः (तीर्णः) स शिवच्छत्रपतिर्जयत्यजेयः
त्या कलिकालाच्या भुजंगास पचविलेल्या अखिल धर्माची हीनावस्था बघून विव्हळ झालेल्या स्वामी म्हणून जगताचे ताप हरण करण्यासाठीच शिवरूप धारण केलेल्या शिवछत्रपतींचा जयजयकार असो. येथील सगळीच धर्मक्षेत्र भयभीत झालेली पाहून व कालिकालरूपी विषारी भुजंगाने ग्रासलेले पाहून जगाचे अधिपती आंशिक रूपाने अजेय जयस्वरूपात शिवछत्रपती म्हणून जगाचे भय निवारण्यासाठी अवतरले.
बुधभूषण ग्रंथाचा दुसरा अध्याय प्रामुख्याने राजनीतिवर आहे. नृप म्हणजे राजाची लक्षणं सांगतात शंभूराजे म्हणतात.
साधुभूतलदेवत्त्वं दुरापसकृतात्मभिःआत्मसंस्कारसंपन्नो राजा भवितुमर्हती
महात्मा प्रवृत्तीचा भूतलावरील श्रीहरी श्री विठ्ठल स्वरूप असलेला, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना त्याच्यावर ताबा मिळू शकत नाही, आत्मसंस्कारांनी परिपूर्ण अशी व्यक्ती राजा होण्यास योग्य असतो.
दैवसंपन्नताबुद्धिरक्षुद्रपरिवारताशक्त्यसामन्तता चैत्र तथा च दृढभक्तिता
म्हणजे दैवी संपत्तीने युक्त अशी सात्विक बुद्धी, उदार व विशाल अंतःकरणाच्या लोकांचा परिवार असणं, त्याचप्रमाणे शक्तिशाली सामन्त पदरी बाळगणं व ते निस्सीम भक्त असणं हे ही मोठ्या राजाचं लक्षण होय असं संभाजी महाराज सांगतात. श्लोक क्रमांक ९७ ते १०६ दरम्यान त्यांनी कोशनिरूपण केलंय. नृपाची लक्षणे, कर्तव्ये लिहितानाच त्यांनी राजांची इतर आवश्यक अंगे(गुण)ही सांगितले आहेत. वानगीदाखल हा ९९ वा श्लोक पाहा...
अर्थादयं परश्चोश्चैश्लोको लोकस्य निश्तिचःपुमानर्थेन रहितो जीवन्नपि न जीवति
राजांचा अर्थोदय नीट असावा. लोकांचे लोकस्थान निश्चित होते. द्रव्याशिवाय असलेल्या पुरूषाचे जीवन हे जीवित असूनही जीवित नसल्यासारखे होते.
आपदर्थंच संरक्ष्यः कोशः कोशवता सदापुत्रादपि हि संरक्ष्यो भार्याहा सुहृदस्तथा
विपत्तीच्या वाढीसाठी कोशाचं संरक्षण करावं, ते पुत्रापासून, मित्रापासून, पत्नीपासूनही संरक्षित ठेवावे.
संभाजी महाराजांनी याशिवाय राजपुत्र, अमात्य, राजपरिवार, प्रधान यांचीही कर्तव्य सांगतली आहेत. शिवरायांचा इतिहास आज आपल्याला अभ्यासायला मिळतो तो त्यांच्या गडकिल्ल्यांतून... संभाजी महाराजांनी दुर्गनिरूपण केलंय.
एक शतं योधयति प्राकारस्थो धनुर्धरःशतं दशसहस्त्राणि तस्मादुर्गं समाश्रयेत्
तटांनी संरक्षित असलेला एक लढवय्या 100 सैनिकांशी लढू शकतो. तसेच 100 योद्धे 10 हजार सैन्याशी लढू शकतात. म्हणूनच दुर्गांचा आश्रय घ्यावा. महाराजांनी दुर्गांचे सहा प्रकार सांगितलेत. 1. धन्वी दुर्ग 2. महीदुर्ग 3. नरदुर्ग 4. वार्क्ष दुर्ग 5. अम्बुदुर्ग आणि 6. गिरीदुर्ग. यापैकी आपल्यातील बहुतेकांनी गड, भुईकोट, जलदुर्ग पाहिले असतील. महाराजांनी सांगितलेल्या नरदुर्गाचा अर्थ म्हणजे हा माणसांनी तुंबळ वेढलेला, शूरवीरांची दुर्गम व्यूहरचना केलेला असतो. उदाहरण आठवायचं असेल तर महाभारत कालातील अभिमन्यूकांड आठवा. चक्रव्यूह फोडण्यासाठी अभिमन्यूने बलिदान दिलं. हे चक्रव्यूह हा नरदुर्गाचंच उदाहरण. वार्क्षदुर्ग हा गर्द झाडींनी वेढलेल्या सशस्त्रधारी सैनिकांनी सज्ज असलेला दुर्ग. जंगल भागात शत्रूवर केलेला गनिमी कावा हा याचं उदाहरण होऊ शकतो. धन्विदुर्ग हा धनुर्धारींनी सुसज्ज असलेला. महीदुर्ग म्हणजे खंदकांनी वेढलेला भुईकोट किल्ला. महाराष्ट्रात चाकण, अहमदनगर, सोलापूर इथे भुईकोट किल्ले आहेत. आग्र्याचा लालकिल्लाही अनेकांनी पाहिला असेल. आता या सहा प्रकारातील सर्वोत्तम प्रकार कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर संभाजी महाराजांनी 115 व्या श्लोकात दिलंय.
सर्वषामेव दुर्गाणां गिरिदुर्गं प्रशस्यतेदुर्गं च परिखोयेतं वप्राट्टालकसंयुतम
या सर्व दुर्गांमध्ये गिरीदुर्ग हा प्रशंसनीय मानला जातो. दुर्ग हा वप्र आणि अट्टालक यांनी युक्त असावा असं ते सांगतात. मात्र केवळ दुर्गांचे प्रकार सांगून ते थांबत नाहीत. दुर्ग कसा असावा, त्याची बांधणी कशी असावी, युद्धशास्त्राच्या दृष्टीने त्याचा वापर कसा व्हावा. दुर्गावरील रचना कशी असावी. कोणती संहारक शस्त्र असावी. दुर्गावर कोणी राहावं, राहू नये, दुर्गावर किती माणसं असावी, त्यांची सोय कुठे असावी, किल्ल्यावर राजाने कुठे राहावं हे सगळं अभ्यासपूर्ण विवेचन संभाजी महाराज करतात.
राम गणेश गडकरी यांनी आपल्या राजसंन्यास या नाटकात संभाजी महाराजांचं वर्णन अतिशय विकृत केलंय. ते तसं त्यांनी का केलं त्यांचं त्यांनाच ठावूक. पण प्रत्यक्ष संभाजी महाराजांनी लिहीलेलं वाचताना एका प्रकांडपंडिताशी आपली ओळख होत जाते. श्लोक क्रमांक 422 मध्ये संभाजी महाराज काय म्हणतात पाहा.
व्यसनानि च सर्वाणि भूपतिः परिवर्जयेत्सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदयाः
राजाची सामान्य कर्तव्ये सांगताना त्यांनी हे सप्तदोषांचं विवेचन केलंय. 1. वाग्दंड म्हणजे फार टोचून बोलणे, 2 पारूष्य म्हणजे कठोर बोलणे, 3. दूरयातंच म्हणजे लांब लांब जाणे, 4. पान म्हणजे मद्य, ताडी अशी मादक द्रव्यपान, 5. स्त्री म्हणजे बायकांचे व्यसन, 6. मृगया म्हणजे विनाकारण गरीब प्राण्यांची शिकार, 7. द्युत म्हणजे जुगार हे राजाने टाळलेच पाहिजेत असं शंभूराजे बजावतात. पुढील काही श्लोकात ते या सर्व दोषांचंही विवेचन करतात. पुन्हा तिसऱ्या अध्यायाच्या 41 व्या श्लोकात प्रकिर्ण नीती सांगतात ते या दोषांवर बोट ठेवतात.
द्यूतं च मांसं च सुरा च वेश्या पापद्विचौर्यं परदारसेवाएतानी सप्त व्यसनानि सप्त नरं सुघोरं नरकं नयन्ति
जुगार, मांसभक्षण, वारूणी, वेश्यागमन, पापच्या संपत्तीने आलेलं वैभव, चौर्यकर्म, दुसऱ्याच्या स्त्रीची सेवा या सात गोष्टी माणसाला नरकात नेतात असं ते सांगतात. संभाजी महाराजांनी स्वतः हे लिहीलेलं आहे. त्यामुळे त्यांची काही नाटक चित्रपटांनी रंगवलेली व्हिलनीश प्रतिमा किती चुकीची आहे हे लक्षात येतं.
संभाजी महाराजांचं आयुष्य हा देशाच्या इतिहासातलं एक खरोखर सोनेरी अध्याय आहे. महाराजांची शस्त्रावरची हुकूमत तर आपण जाणतोच, पण शास्त्रावरचं त्यांचं प्राविण्य खरोखर वाचण्यासारखं आहे. हे पुस्तक खरोखर पथदर्शी आहे. संभाजी महाराजांच्या नावे राजकारण करणं, घोषणा देणं, कबरी उखडण्याची भाषा करणं, जातीपातीचं राजकारण करणं यापेक्षा आज महाराष्ट्राने संभाजी महाराज अभ्यासणं ही काळाची गरज आहे. अगदी विधिमंडळात बसून ते राज्याचा गाडा हाकणाऱ्यांपासून ते विद्यापीठांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत शंभूराजांचा अभ्यास व्हावा. या निमित्ताने एक मुद्दा लिहिवासा वाटतो. राज्यशास्त्रात मी एम ए केलं. राज्यशास्त्रात वेस्टर्न पोलिटिकल थॉट्स अगदी आवडीने शिकवले जातात. निकोल मॅकॅव्हली, त्यांनी लिहिलेलं प्रिन्स अभ्यासात लावलं जातं. मग आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी लिहीलेलं बुधभूषण राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी का नाही ठेवलं जात? चीनचा विचारवंत सन त्सूचं द आर्ट ऑफ वॉर आपल्याकडे अगदी चवीने वाचलं जातं, मग आमच्या संभाजी महाराजांच्या ग्रंथांचा का शोध घेतला जात नाही. का हा ग्रंथ आवडीने वाचला जात? समाज म्हणून हा आपला दोष आहे. शालेय अभ्यासक्रम, विद्यापीठं संभाजी महाराजांचं हे महात्म्य सांगण्यात कमी पडली हे त्रिवार सत्य आहे. जाता जाता आणखी एक विनंती संभाजी महाराजांना ढाल करून महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण करणाऱ्या संघटनांनी आधी ग्रंथराज बुधभूषण अभ्यासावा. संभाजी महाराज हा भांडण्याचा नाही तर अभ्यासून त्यांच्या विचारांनी आचरण करण्याचा विषय आहे हे ध्यानात घ्यावं.