Mahatma Phule and Ayushman Yojana : राज्यातील खासगी रुग्णालयात रुग्णांची होणारी लूट दूरच राहिली, पण धर्मादाय रुग्णालये सुद्धा सरकारच्या जमिनी काडीमात्र किंमतीत घेऊन आणि टॅक्स सुद्धा न भरता सेवा देण्याच्या नावाने किंती बोंबाबोंब करत आहेत हे पुण्यातील मस्तवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावरून समोर आले. सत्ताधारी भाजप आमदाराच्या पीएच्या पत्नीला मंत्रालयापर्यंत सांगूनही अॅडव्हान्सच्या नावाखाली उपचार नाकारण्यापर्यंत मजल गेली आणि दुर्दैवी महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन जुळ्या लेकी आईच्या मायेला कायमच्या पोरक्या झाल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू नसल्याकडे सुद्धा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष वेधले. मुश्रीफ यांनी गल्ली ते दिल्ली दररोज गाजावाजा केली जाणारी आयुष्मान योजना मुंबईमधील कोणत्याच रुग्णालयात लागू नसल्याचे आज कोल्हापुरात बोलताना सांगितले. त्यामुळे शासकीय जाहिराती करून डंका पिटला जात असताना गरीब रुग्णांची मेट्रो शहरातील किती वाताहत होत असेल, याचा अंदाज न केलेला बरा अशी स्थिती झाली आहे. 

लाडक्या बहिणीच्या नादात आरोग्याचा खेळखंडोबा

दुसरीकडे, कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावमधीमध्ये आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील संलग्न रुग्णालयांची सरकारकडे किती रक्कम थकित आहे याची माहिती घेण्यासाठी आरटीआय दाखल केला होता. यामध्ये लाडक्या बहिणीच्या नादात आरोग्याचा खेळखंडोबा झाल्याचे दिसून आलं आहे. दोन्ही योजनांमधील तब्बल 270 कोटीहून अधिक रक्कम 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये संबंधित रुग्णालयांना अदा केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारकडे पैसा थकित असल्याने संबंधित रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत असल्याचे सुनील मोदी यांनी निवेदनात म्हटलं आहे. सुनील मोदी यांनी जिल्हानिहाय किती रक्कम सरकारकडून अदा करण्यात आलेली नाही याची माहिती दिली. 

दोन्ही योजनांचे 270 कोटी रुपये थकित 

1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये सरकारकडून संलग्न रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनातंर्गत 220,24,65,655 कोटी थकित आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य योजना अंतर्गत 37,29,90,650 कोटी रुपये थकित आहेत. 

दोन्ही योजना महाराष्ट्रात बंद पडण्याच्या मार्गावर 

सुनील मोदी यांनी राज्यात दोन्ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. या योजनेचा पुरेपूर फायदा रुग्णांना व्हावा व संलग्न रुग्णालयातील थकित रक्कम त्वरित अदा कराव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देणार असल्याचे म्हटले आहे.  मागण्या मान्य झाल्या नाही, तर ठाकरे गटाकडून राज्यभर आंदोलन  उभा करण्याचा इशारा दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या