मुंबई: पुणेकरांना आणि मुंबईकरांना मान्सूनसाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार असून 25 जूननंतर या शहरात मान्सून येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर विदर्भात आज मान्सूनचे आगमन झालेले आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सावकाश पाऊस वाढेल असं सांगण्यात आलं आहे. 


विदर्भात आज मान्सूनने हजेरी लावली आहे. उपराजधानीसह अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी संथ तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक घाट परिसरात 25 तारखेपासून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 27 जून नंतर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात येऊ शकतो. 


सिंधुदुर्गात आत पावसाची हजेरी


सिंधुदुर्गात आज पावसाने हजेरी लावली असून बळीराजा आनंदीत झाला आहे. जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यासह काही भागात लागला असून अर्धा अधिक जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान विभागाने आज उद्या तळकोकणात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज लागलेल्या या पावसाने बळीराजा आनंदीत झाला असून नियमीत पावसाकडे त्याच्या नजरा लागल्या आहेत. 


नांदेडमध्ये पेरण्या खोळंबल्या 


मान्सून लांबल्याने नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. नांदेड शहरातील नवीन मोंढा बाजारात दरवर्षी या दिवसात शेतकऱ्यांची मोठी गर्दी असते. परंतु मान्सून लांबल्याने या बाजारात शुकशुकाट पाहवयास मिळत आहे. नवीन मोंढा बाजारात बी बियाणांची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. काही शेतकऱ्यांनी बी बियाणांची खरेदी केली. पण अद्याप अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बी बियाणांची अद्याप खरेदी केली नाही. बी बियाणांची विचारपूस करून शेतकरी जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत.


पावसाची परीक्षा, हवामान खातं फेल


हवामान विभागाने सुरुवातीला 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला. मान्सून नेहमीप्रमाणे 1 जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला. मान्सून 7 जूनला कोकणात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला. 9 जूनपर्यंत मान्सून पुणे, मुंबईसह 
महाराष्ट्र  व्यापेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला. मान्सून तळकोकणात 9 जूनला दाखल झाला खरा, मात्र मान्सून पुढे सरकला नाही. त्यानंतर मुंबई- पुण्यात मान्सून आगमनाची 16 जून ही नवी तारीख वर्तवण्यात आली. नंतर मान्सून आगमनाच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आणि 23 जून ही नवी तारीख जाहीर करण्यात आली. 23 जूनला काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली. 


ही बातमी वाचा: